योगेश खरे झी मीडिया नाशिक : वेगवेगळी आमिषं दाखवून सामान्यांना गंडा घातल्याची अनेक उदाहरणं आपण रोज पाहतो. पण विधानसभा निवडणुकीत (Maharashtra VidhanSabha Election) चक्क उमेदवारी मिळवून देण्याच्या नावाखाली लाखो रुपये उकळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. नाशिक पोलिसांनी दोन आरोपींना याप्रकरणी अटक केली आहे. या भामट्यांनी आमदारांनाच गंडा घालण्याचा प्रयत्न केला होता. निवडणुकीसाठी पुन्हा उमेदवारीसाठी अनेक आमदार प्रयत्न करतायत. हीच संधी साधून सर्वेश मिश्रा आणि गौरव बहादूर सिंग या दोघांनी आमदारांना फोन करण्यास सुरुवात केली. पंतप्रधान कार्यालयात मुख्य सचिव असल्याचं सांगत त्यांनी नाशिकच्या भाजप आमदाराकडे चक्क पन्नास लाखांची मागणी केली.
आरोपींनी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील 3 अहमदनगर, कल्याण आणि पुण्यातील प्रत्येकी एक असं सहा जणांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला होता. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आरोपींनी याच पद्धतीनं पन्नास लाख रुपये उकळले होते. एक डाव यशस्वी झाल्यानं त्यांनी महाराष्ट्रातही तसाच प्रयत्न केला.
एकदा यशस्वी झाल्यानंतर या लुटारुंचा आत्मविश्वास वाढला होता. पण लोकप्रतिनिधींच्या सतर्कतेमुळं भामट्यांना डाव फसला असून आता त्यांना कोठडीचे गज मोजावे लागणार आहेत.