नाशिक : नाशिक महानगर पालिकेची महासभा अभूतपूर्व गोंधळात गुंडाळावी लागली. दोन स्थायी समितीच्या सभेत घरपट्टी, पाणी पट्टीमध्ये वाढ करण्यात आलीय. अंतिम मंजुरीसाठी महासभेकडे प्रस्ताव पाठवण्यात आलाय.
सत्ताधा-यांनी नाशिककरांवर लादलेली करवाढ मागे घ्या, या विषयावर सदस्यांना बोलू द्या अशी आग्रही मागणी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांनी लावून धरली. मात्र, सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी विषय पत्रिकेतील विषयावर चर्चा करण्याची भूमिका घेतल्यानं दोन्ही बाजूनं घोषणाबाजी सुरु झाली.
कर वाढीचा प्रस्ताव महासभेच्या पटलावर आलेला नाही. त्यामुळे ज्यावेळी विषय येईल त्यावेळी या विषययावर चर्चा केली जाईल असा पवित्रा महापौरांनी घेतला. यानंतर विरोधक घोषणाबाजी करत महापौरांच्या आसना जवळ गेले, आणि राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला.
अखेर 10-15 मिनिटांच्या झटापटीनंतर सुरक्षारक्षकांनी राजदंड ताब्यात घेतला. या गोंधळात महापौरांनी राष्ट्रगीत सुरु करून अवघ्या काही मिनिटात सभा गुंडाळून टाकली.