विष्णु बुरगे, झी मीडिया, बीड - ग्रामीण भागामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांचा पट वाढवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून शालेय पोषण आहार योजना राबवण्यात येते. या योजनेसाठी सरकार कोट्यवधी रूपये खर्च करतं. मात्र बीडमधील वडगाव कळसंबर येथील जिल्हा परिषद शाळेतून धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. त्यामुळे शिक्षण विभागाचा भोंगळ कारभारही चव्हाट्यावर आला आहे.
बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊसतोड कामगार आहेत, त्यांचं हातावर पोट असल्यामुळे ते आपल्या मुलांना कामावर घेऊन जातात. म्हणूनच शाळेमध्ये सकस आहार देत शाळेतील विद्यार्थांची संख्या वाढवण्याचा सरकारचा उद्देश आहे. मात्र शिक्षण विभाग याकडे दुलर्क्ष करत असल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे.
वडगाव कळसंबर येथील जिल्हा परिषद शाळा या शाळेमध्ये तब्बल 122 विद्यार्थी शिक्षण घेतात सातवीपर्यंत वर्ग असणाऱ्या या शाळेत शालेय पोषण आहार शिजवणारे किचन शेड पावसामध्ये आहे. विशेष म्हणजे इथे पोषण आहार शिजवताना तेल मिळत नाही असा धक्कादायक खुलासा मुख्याध्यापक लक्ष्मण क्षीरसागर यांनी केला आहे. तेल का मिळत नाही असं विचारल्यानंतर वरिष्ठ अधिकारी तुमचे तुम्ही भागून घ्या असं सांगत असल्याचं क्षीरसागर यांनी सांगितलं. जिल्हा परिषद शाळेच्या पोषण आहारातून तेल गायब झालं आहे. 321824 लाभार्थी विद्यार्थ्यांचे तेल गेले कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, 1228 जिल्हा परिषद 90% शाळांमध्ये किचन सेट शिक्षण विभागाने दावा केला आहे. मात्र, प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे. शाळांमध्ये गॅस नाही तर चुलीवर पोषण आहार शिजवला जातो. त्यासोबतच जिल्हा परिषद शाळांमध्ये मूलभूत सुविधांची वानवावा, स्वच्छ पिण्याचे पाणी नाही तर कुठे शौचालयही नाही.