PM Modi On Maharashtra Din: राज्यभरामध्ये आज महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीला आजच्या दिवशीच 65 वर्ष पूर्ण होत असून यानिमित्त राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी झेंडावंदनाबरोबरच वेगवेगळ्या संस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झेंडावंदन करुन नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आज महाराष्ट्र दिनाप्रमाणेच गुजरात राज्याचाही स्थापना दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या दोन्ही राज्यांना त्यांच्या स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राला मराठी भाषेत मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत. तर गुजरातमधील नागरिकांना राज्याच्या स्थापना दिनानिमित्त गुजराती भाषेत शुभेच्छा दिल्यात. पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणालेत पाहूयात...
पंतप्रधान मोदींनी परंपरा, प्रगती आणि एकता यांच्या उत्तुंग दीपस्तंभाप्रमाणे महाराष्ट्र उभा आहे, असं म्हणत महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "महाराष्ट्र दिन म्हणजे या भूमीचा वैभवशाली वारसा आणि अदम्य भावना यांचा गौरव करण्याचा दिवस आहे. ज्या भूमीने महान दूरदर्शी घडवले आहेत आणि हा दिवस या राज्याच्या सांस्कृतिक समृद्धीशी संबंधित आहे. परंपरा, प्रगती आणि एकता यांच्या उत्तुंग दीपस्तंभाप्रमाणे महाराष्ट्र उभा आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काम करत राहण्याच्या आमच्या बांधिलकीचा आम्ही देखील पुनरुच्चार करत आहोत. महाराष्ट्राच्या जनतेला माझ्या हार्दिक शुभेच्छा," असं पंतप्रधान मोदींच्या अधिकृत एक्स (ट्वीटर) हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आलं आहे.
महाराष्ट्र दिन म्हणजे या भूमीचा वैभवशाली वारसा आणि अदम्य भावना यांचा गौरव करण्याचा दिवस आहे ज्या भूमीने महान दूरदर्शी घडवले आहेत आणि हा दिवस या राज्याच्या सांस्कृतिक समृद्धीशी संबंधित आहे. परंपरा, प्रगती आणि एकता यांच्या उत्तुंग दीपस्तंभाप्रमाणे महाराष्ट्र उभा आहे.…
— Narendra Modi (@narendramodi) May 1, 2024
गुजरात दिनानिमित्तही पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आहेत. गुजराती भाषेत पंतप्रधान मोदींनी, "गुजरात राज्य स्थापना दिनाच्या या शुभ प्रसंगी, मी राज्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, उल्लेखनीय कामगिरी आणि लोकांच्या चैतन्यशील भावनेचे स्मरण करतो. उद्योजकता, अनुकुलन आणि सर्वसमावेशक विकासाच्या मूल्यांनी गुजरात सदैव समृद्ध होवो या प्रार्थनेसह सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा!" असं म्हटलं आहे.
ગુજરાત રાજ્ય સ્થાપના દિવસના આ પાવન અવસર પર હું રાજ્યના સમૃદ્ધ સાંસ્કૃતિક વારસા, નોંધપાત્ર સિદ્ધિઓ અને લોકોની જીવંત ભાવનાને યાદ કરું છું. ગુજરાત ઉદ્યોગ-સાહસિકતા, અનુકૂલન અને સર્વસમાવેશક વિકાસના મૂલ્યો સાથે સદાય સમૃદ્ધ થતું રહે તેવી અભ્યર્થના સાથે સૌ નાગરિકોને ખૂબ ખૂબ…
— Narendra Modi (@narendramodi) May 1, 2024
पंतप्रधान मोदी मागील 2 दिवसांपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. त्यांनी महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 6 सभांना संबोधित केलं. यावेळेस मोदींनी महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजपा आणि मित्रपक्षाच्या उमेदवारांना मतदान करावं असं आवाहन मतदारांना केलं.