पुणे : दिवाळी बोनस मिळावा या मागणीसाठी पुण्यातील पीएमपीएल कर्मचारी संघटना एकवटल्या आहेत. बोनस न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी दिलाय.
पीएमपीएल म्हणजेच पुणे महानगर परिवहन महामंडळ तोट्यात असल्याचं कारण देत पीएमपीएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी ड्रायव्हर्स, कंडक्टर्स तसेच इतर कर्मचाऱ्यांना बोनस देणं शक्य नसल्याचं म्हटलय.
त्याचप्रमाणे यासंदर्भात आंदोलन न करण्याची ताकीदही नोटीसीद्वारे दिलीय. मात्र कर्मचारी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. त्यांची बैठक आज सारसबागेत झाली.
तुकाराम मुंढेनी मार्चमध्ये पीएमपीएलचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला होता. यानंतर त्यांनी अनेक निर्णय घेतले. कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत एक तास वाढ करताना ते सात तासावरुन ८ तास केले. कर्मचाऱ्यांनी टी-शर्ट आणि जीन्स वापरू नये, अशी ताकीद दिली.
कोणत्याही कर्मचाऱ्याने इतर कार्यालयांत कामाशिवाय जाऊ नये. त्यात प्रामुख्याने चहा घेण्यासाठी इमारतीच्या बाहेर न जाता कॅन्टीनमध्येच जावे. धूम्रपान करता कामा नये. तसे करताना आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
पुणे शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करतात. त्यांची संख्या सद्यस्थितीला १२ लाख असून त्यातून दीड कोटी रुपये उत्पन्न मिळत असून ते दोन कोटींवर जाऊ शकते. त्यासाठी प्रत्येक आगारातून बस वेळेवर सोडल्या पाहिजेत.
गाड्या सोडण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज असून प्रवाशांबरोबर चांगल्या प्रकारे संवाद साधला पाहिजे. त्यामुळे प्रवाशांमध्ये चांगली भावना निर्माण होऊन ते दररोज बसने प्रवास करतील.
थांब्यावरच गाडी थांबली पाहिजे. पुढे-मागे गाडी थांबवू नका. ज्येष्ठांना प्राधान्य देण्याची गरज आहे. भविष्यात उत्पन्न न वाढल्यास कारवाईला सामोरे जावे लागू शकते.
गाड्यांच्या दुरुस्तीसाठी जे स्पेअर पार्ट लागतात, तितकीच खरेदी करा, अधिकची खरेदी करू नका. त्याचा दर्जा चांगला असला पाहिजे. प्रत्येकाने जबाबदारी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या, असे अनेक निर्णय घेतले.