Traffic Free Mumbai Entry And Exit: केवळ भारतामधील नाही तर वाहतूक कोंडीमुळे जगातील सर्वाधिक व्यस्त चौक म्हणून एकेकाळी ओळखला जाणारा ठाण्यातील तीन हात नाका चौक कात टाकणार आहे. सर्वाधिक वर्दळ असलेल्या चौकांपैकी एक असणाऱ्या तीन हात नाका येथील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी आता यू आकारच्या एलिव्हेटेड मार्गाची उभारणी करण्याची तयारी सुरु झाली आहे. यासंदर्भातील मास्टर प्लॅन ठाणे महानगरपालिका प्रशासनाने 'एमएमआरडीए'कडे पाठवला आहे. हा नवा एलिव्हेटेड मार्ग उभारल्यास तीन हात नाका येथे होणारी वाहतूक कोंडीची समस्या कायमची संपणार असून मुंबईमधून ठाण्यात येणाऱ्यांना तसेच ठाण्यातल्या ठाण्यात या मार्गाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्यांना अडकून पडावं लागणार नाही.
तीन हात नाका येथे ठाणे शहरातील सात प्रमुख रस्ते एकत्र येतात. ठाणे, मुंबई, नाशिक घोडबंदरमार्गे गुजरातकडे जाणारी अवजड वाहने हा नाका टाळून पुढे जाऊच शकत नाही. त्यामुळे या ठिकाणी दिवसरात्र प्रचंड प्रमाणात वाहनांची ये-जा सुरु असते. त्यातच खासगी वाहने, दुचाकींबरोबरच बस वाहतूक आणि रिक्षांची संख्या अधिक प्रमाणात असल्याने इथे वाहतूक कोंडीची समस्या ही आता ठाणेकरांच्या सवयीचा भाग झाल्यासारखी झाली आहे. या ठिकाणी एकाचवेळी सात रस्ते एकत्र येत असल्याने एकदा सिग्नल लागला की तो तब्बल 180 सेकंद ते 206 सेकंद म्हणजेच तीन ते साडेतीन मिनिटांसाठी असतो. त्यामुळेच एका मार्गावरुन वाहने जात असताना अन्य सहा मार्ग थांबवून ठेवावे लागतात. यावरुन या नाक्यावरील वाहतूकीचा अंदाज बांधता येईल.
या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून इथे भुयारी मार्ग बांधून टप्प्याटप्प्यात वाहतूक नियंत्रणात आणण्याचा एक प्रस्ताव मांडण्यात आलेला. मात्र तांत्रिकदृष्ट्या या ठिकाणी वाहनांची ये-जा करण्यासाठी भुयारी मार्ग बांधता येणार नाही असं निदर्शनास आल्याने हा पर्याय वगळण्यात आला.
काही दिवसांपूर्वीच एमएमआरडीचे आयुक्त संजय मुखर्जी आणि ठाणे महानगर पालिका आयुक्त सौरभ राव यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत ठाण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी एमएमआरडीने ट्रॅफिक इम्परुव्हमेंट प्रोजेक्ट राबवण्यास उत्सुक असल्याचं पालिकेला कळवण्यात आलं. त्यानुसार एमएमआरडीने त्यांचा प्रस्ताव पालिकेपुढे ठेवला. तर पालिकेकडून नोडल सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या मे. इन्फ्रा डिझाइन कंपनीने तयार केलेला प्लॅन एमएमआरडीएसमोर सादर करण्यात आला.
ठाणे महानगरपालिकेने पाठवलेल्या प्रस्तावानुसार, हरिनिवास सर्कल, इस्टर्न एक्सप्रेस वे, ज्ञानसाधना कॉलेजजवळ तयार होत असलेलं नवीन ठाणे रेल्वे स्टेशन, अॅपलॅब चौक असा हा एलिव्हेटेड मार्ग उभारला जाणार आहे. या मार्गामुळे प्रवास अधिक वेगवान होण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात इंधन आणि वेळेची बचत होईल असं सांगितलं जात आहे.
नवा एलिव्हेटेड मार्ग हरिनिवास चौकामधून सुरु होईल. हा मार्ग पुढे तीन हात नाक्याच्या सर्व्हिस रोडवरुन यू आकारामध्ये एक्सप्रेस वे क्रॉस करुन पलिकडच्या सर्व्हिस रोडवर संपेल. हाच मार्ग पुढे अॅपलॅब चौकात नेऊन नव्या ठाणे रेल्वे स्थानकातून येणाऱ्या मार्गाशी तो जोडला जाईल. या मार्गावर काही ठिकाणी एक्झिट पॉइण्ट्स दिले जातील. त्यामुळे या मार्गाचा अधिक ठाणेकरांना फायदा होईल.
2014 साली तत्कालीन महापालिका सचिव असीम गुप्ता यांनी काही अभ्यासांचा संदर्भ देत, सर्वाधिक वर्दळीच्या कालावधीत सर्वात जास्त गोंधळ असलेला चौक कोणता याबद्दल अभ्यास करण्यात आला असता जगातील सर्वात गोंधळ असलेल्या चौकासंदर्भात तपासणी करताना जी प्रमाणं वापरलं होती त्यापेक्षाही भयंकर स्थिती तीन हात नाक्याला असते, असं म्हटलं होतं. वाहनांची वाढती संख्या पाहता आजही ही परिस्थिती फारशी सुधारलेली नाही असं म्हणता येईल. आता हा नवा मार्ग त्यावर काही तोडगा काढतो का हे येणारा काळच ठरवेल.