सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : सुसंस्कृत पुण्यात पुन्हा एकदा जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आजारातून बरं करण्यासाठी जादूटोणा केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तक्रार केल्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी पीडितांकडून तब्बल 35 लाख रुपये देखील उकळले आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. महत्त्वाती बाब म्हणजे पुण्यात वारंवार असे प्रकार घडत असल्याने आता चिंता व्यक्त केली आहे.
पुण्यातील चंदन नगर परिसरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलाला मानसिक आजारातून बरे करण्यासाठी जादूटोणा करण्यात आला आहे. घरातील अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि मुलाची मानसिक आजारातून मुक्तता करण्यासाठी आरोपींनी पीडितांचा विश्वास संपादन करून अघोरी विद्या केली आहे. आरोपींनी अघोरी विद्या करून जादूटोण्याच्या मंत्राच्या सहाय्याने 35 लाख रुपये उकळले आहेत. याप्रकरणी चारुदत्त मारणे याच्यासह चार जणांवर चंदन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चारुदत्त मारणे याने आणखी 50 लाख रुपये द्या नाहीतर तुमच्या मुलाचा आणि पतीचा मृत्यू होईल. तुमच्या घराचा नायनाट होईल असं बोलून धमकावलं होतं. त्यानंतर पीडित महिलेने चंदन नगर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद नोंदवली होती. पोलिसांनी आरोपीविरुद्ध आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे, नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.