सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : घराजवळ खेळत असलेल्या एका दहा वर्षाच्या अल्पवयीन दिव्यांग मुलीचं दोघांनी अपहरण केलं. त्यानंतर तिला जबरदस्तीने दारू पाजून तिच्यासोबत अश्लिल कृत्य केलं. ही धक्कादायक घटना काळेपडळ परिसरात शुक्रवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली.
याप्रकरणी एका 32 वर्षाच्या महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी राठोड नावाचा व्यक्ती आणि त्याच्या एका साथीदाराविरुद्ध अपहरण, विनयभंग आणि बाललैंगिक अत्याचाराच्या विविध कलमान्वे गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 10 वर्षाची मुलगी दिव्यांग असून तिला बोलताही येत नाही. शुक्रवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास ती घराजवळ असलेल्या कॉलनीत खेळत होती. यावेळी मोटारसायकलवरुन दोघे जण आले. त्यांनी तिला कशाचे तरी आमिष दाखवून मोटारसायकलवरुन जबरदस्तीने एका ठिकाणी पळवून नेले.
तिथे मुलीच्या दिव्यांगपणाचा फायदा घेऊन राठोड आणि त्याच्या साथीदाराने दारू पाजून तिच्यासोबत अश्लिल कृत्य करून विनयभंग केला.
मुलगी बेपत्ता झाल्याचं लक्षात आल्यावर तिच्या नातेवाईकांनी शोधाशोध सुरु केली. तब्बल दोन ते अडीच तासांनंतर रात्री साडेअकरा वाजता ती घराजवळच सापडली. आरोपी राठोड याने तिला ती रहात असलेल्या परिसरात आणून सोडलं. यावेळी परिसरातील काही नागरिकांनी त्याला पाहिलं आणि याबाबतची माहिती त्या मुलीच्या पालकांना दिली.
त्यानुसार पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेत राठोड आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध फिर्याद दाखल केली.
अशी फुटली घटनेला वाचा
मुलीने आईला सांकेतीक भाषेत तिच्यासोबत घडलेल्या घृणास्पद प्रकाराची माहिती आईल दिली दिली. त्यावरुन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.