पुणे : कोंढवा दुर्घटनेप्रकरणी बांधकाम व्यावसायिक विपुल अग्रवाल आणि विवेक अग्रवाल या दोन्ही भावांना २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सीमा भिंत कोसळणं ही नैसर्गिक घटना आहे. याला बिल्डर जबाबदार नाही. बाजूचे खोदकाम भिंत कोसळण्याला जबाबदार आहे. कागदपत्र पोलीस कधीही तपासू शकतात. इमारत आणि दुर्घटना स्थळ जागेवरच राहणार आहे, त्यामुळे दोघांना जामीन द्यावा, अशी मागणी आरोपींच्या वकिलांनी केली होती. तर दोघांना १० दिवस पोलीस कोठडी द्यावी, असं सरकारी वकील म्हणाले.
पुण्यातील कोंढवा बुद्रुक परिसरात इमारतीची संरक्षक भिंत कोसळून १५ मजुरांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कोंढवा बुद्रुक परिसरात आल्कन स्टायलिश इमारतीची संरक्षक भिंत मजुरांच्या तात्पुरत्या बांधलेल्या पत्र्याच्या खोल्यांवर कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. ही भिंत मोठी असल्यानं आणि कामगारांच्या खोल्या खड्ड्यात असल्याने मोठ्या प्रमाणात भिंतीचा ढिगारा घटनास्थळी पडला.