Pune Crime News : पुण्यात येऊन चोरी करून पसार होऊ पाहणाऱ्या एका टोळीला शहरातील बंडगार्डन पोलिसांनी ताब्यात घेत त्यांचा पर्दाफाश केला आहे. पुणे आरटीओनजीक असणाऱ्या रिलायन्स फॅशन फॅक्ट्री मॉल येथे चोरी करण्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर ही अटकेची कारवाी झाली. पुण्यातील चोरांची ही टोळी राजस्थानातून चक्क विमानप्रवास करत इथं दाखल होऊन चोरी करत असल्याचं तपासातून उघड झालं आणि अनेकांनाच हादरा बसला.
गौरव कुमार रामकेश मीना (19 वर्षे), बलराम हरभजन मीना (29 वर्षे) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावं असून, त्यांच्यासोबत या टोळीचा म्होरक्या, योगेश कुमार लक्ष्मी मीना (25 वर्षे) आणि सोनू कुमार बिहारीलाल मीना (25 वर्षे) या चौघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अटक करण्यात आलेले चारही जण राजस्थानचे रहिवासी असून, त्यांनी मॉलमधून कपडे आणि बुटांसह साधारण 1.54 लाख रुपयांच्या वस्तू चोरल्याचं उघड झालं.
रविवारी सायंकाळी पुण्यात हा प्रकार घडला, ज्यावेळी सुरक्षा रक्षकानं घटनास्थळावरून पळ काढण्य़ाचा प्रयत्न करणाऱ्या दोन चोरट्यांना अडवलं आणि तिथंच त्यांचा डाव फसला. पुढं तपासासून मॉलनजीक असणाऱ्या एका पेट्रोल पंपावर उभ्या असणाऱ्या कारमधून त्यांनी चोरलेल्या गोष्टी ताब्यात घेण्यात आल्या.
पोलिसांनी तातडीनं तपास यंत्रणांना सूचना केल्या आणि या टोळीच्या म्होरक्याला खडकी बाजारातील एका हॉटेलातून ताब्यात घेण्यात आलं. तर, सोनू मीनाला पुणे रेल्वे स्थानकावर हटकण्यात आलं. दरम्यान, पुण्यातील बंडगार्डन पोलिसांत यापूर्वी दाखल करण्यात आलेल्या चोरीच्या दोन तक्रारींचे धागेदोरेही याच टोळीशी जोडण्यात आले.
तपासातून समोर आलेल्या धक्कादायक माहितीनुसार पुण्यात दाखल होण्याआधी ही टोळी विमान प्रवास करत जयपूरहून मुंबईत दाखल झाली. इथं त्यांनी नोंदणी नसणाऱ्या दुचाकी एका अॅपच्या माध्यमातून बुक केल्या. एखाद्या मोठ्या दुकानात ग्राहक म्हणून जात चेंजिंग रुममध्ये गेल्यावर तिथं कपड्यांवरील बारकोड काढत त्यांनी हळुहळू अनेक गोष्टी लंपास केल्याचं तपासातून समोर आलं आणि या हाय प्रोफाईल चोरांचं बिंग फुटलं.