अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : बुधवारी रात्री झालेल्या पावसानं पुणे शहराची अक्षरशः दाणादाण उडवून दिली. या पावसात एकाचा बळी देखील गेला. त्यामुळं पालिका प्रशासनाचा नाकर्तेपणा पुढं आलाय. आता पावसानं आणखी दोन दिवसांचा मुक्काम वाढवल्यानं पुणेकर धास्तावलेत.
एस पी कॉलेज चौकातील पिंपळाच अवाढव्य झाड बुंध्या सकट उन्मळून पडलं. एका बस चालकाचा त्याखाली नाहक जीव गेला. हे झाड का कोसळलं याचा अभ्यास करावा लागणार आहे.
बुधवारी रात्री अवघ्या तासाभराच्या पावसानं पुणे शहरात हाहाकार उडाला. वादळी पावसात कितीतरी झाडांच्या फांद्या छाटल्या गेल्या, तर कितीतरी झाडं मुळासकट आडवी झाली.
त्याचवेळी शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं. अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते. त्याचा परिणाम म्हणून सर्वत्र मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अवघं अर्धा किलोमीटर अंतर कापायला दोन ते अडीच तास लागले.
लोकांच्या घरादारात पाणी शिरलं होतं. पुणे शहरात पुन्हा एकदा 26/9 सारखी परिस्थिती उद्भवते की काय? अशी भीती दाटून आली होती.
पुण्यात अचानक पणे मोठा पाऊस झाला ही गोष्ट मान्यच आहे. तरीदेखील झाडांची काळजी न घेतली जाणं, पाण्याचा निचरा न होणं या गोष्टींसाठी महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप संतप्त नागरिकांकडून होत आहे.
पुण्यातील टिळक रस्ता, सिंहगड रस्ता, राजाराम पूल परिसर, शास्त्री रस्ता, सहकार नगर अशा अनेक ठिकाणी पावसाचा कहर अनुभवायला मिळाला.
महत्त्वाचं म्हणजे यावर्षी ही परिस्थिती अनेकदा उद्भवली. स्मार्ट सिटी असलेल्या शहराचं हे नागरी वास्तव आहे. निवडणुकीच्या काळात तरी कारभाऱ्यांनी त्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे.