नितीन पाटणकर, प्रतिनिधी, झी मीडिया, पुणे : मर्सिडिज बेंझमधून येऊन दरोडा घालणाऱ्या दरोडेखोरांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. लोणावळ्यातल्या बंगल्यामध्ये चोरी करताना हे चोर सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. राजेश खन्ना आणि आशा पारेखच्या कटी पतंग चित्रपटाचं चित्रीकरण याच बंगल्यात झालं होतं. त्याच बंगल्यात या चोरांनी चोरी केली.
मोहम्मद इरफान अख्तर शेख आणि मोहम्मद मारूफ मतिउर अली हे दोघेही बिहारहून मुंबईला विमानानं यायचे. महागड्या हॉटेलमध्ये राहायचे. आणि मर्सडीझ बेंझ किंवा अशाच आलिशान गाडीतून चोरीसाठी बाहेर पडायचे. पोलिसांना संशय येऊ नये यासाठी हा सगळा खटाटोप. दिल्लीमध्ये या दोघांच्या विरोधात सात गुन्हे दाखल आहेत. लोणावळ्यातील बंगल्यातूनही त्यांनी सात लाखांचा माल लंपास केला होता. आता या दोघांबरोबर मोठी टोळी आहे का, त्यांनी राज्यात आणखी किती दरोडे टाकलेत, याचा तपास पोलीस करतायत.