श्रीकांत राऊत, गजाजन देशमुख, अमर काणे झी मीडिया, नागपूर : खरीपाच्या नुकसानीतून उभं राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याला पुन्हा अवकाळी पावसाने फटका दिला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
लांबलेल्या पावसाने खरीपाचं नुकसान केलेलं असतानाच आता पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपिट सुरू झाली. विदर्भातल्या नागपूर, यवतमाळ, वर्धा, अमरावती, वाशिम अकोल्यात शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. काढणीला आलेला कापूस भिजलाय. संत्र्यांच्या बागांनाही मोठा फटका बसलाय. ढगाळ वातावरणामुळे तूर आणि हरभऱ्यावर किडीचा प्रादुर्भाव झालाय. गारपिटीमुळे गव्हाचंही नुकसान झालं आहे.
दुसरीकडे, मराठवाड्यातील हिंगोलीतही पाऊस झाला आहे. पावसामुळे पिकांचं नुकसान झालं. शिवाय रोगराईचा प्रादुर्भावही होण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरणात पिकांची काळजी घेण्याचं आवाहन कृषितज्ज्ञांनी केलं आहे.
खरीपाच्या नुकसानीतून शेतकरी सावरत असतानाच आता रब्बीवर अवकाळीचं संकट ओढवलंय. बदललेल्या निसर्गचक्रामुळे आणि नैसर्गिक संकटांचा सामना करत शेती करणं शेतकऱ्यांसाठी अवघड होऊन बसलं आहे.
गेल्या वर्षी परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील पीकांचं मोठं नुकसान झालं होतं. अवकाळी पावसामुळे शेतातील कापूस ओला झाला असून मोठं नुकसान होत आहे. रब्बी हंगामातील गहू पिकाला पावसाचा फायदा असला तरी धुकं देखील पडत असल्याने गव्हावर रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
पावसामुळे गारठ्यात वाढ झाली असून भाजीपाला वर्गीय पिकांवर याचा परिणाम होत आहे. ४ जानेवारीपर्यंत विदर्भात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस तर काही ठिकाणी वादळी पावसासह गारपीटीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे.