Raj Thackeray At Nashik : पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघांचा राज ठाकरे (Raj Thackeray) आढावा घेण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर होते. मात्र, पुण्यातील पक्ष कार्यालयात कुणीही उपस्थित नसल्याने राज ठाकरे यांना राग अनावर झाला अन् पुण्यातून तडकाफडकी मुंबईला रवाना झाले. राज ठाकरे येणार माहीत असूनही एकही पदाधिकारी न आल्याने राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना चांगलंच झापलं. अशातच आता राज ठाकरे यांचा आगामी दौरा ठरला आहे. लोकसभा निवडणुकांसाठी (LokSabha Elections 2024) राज ठाकरे यांची चांगलीच कंबर कसल्याचं दिसून येतंय.
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुंबईतील लोकसभा निहाय भेटी दौरा ठरला आहे. 5 फेब्रुवारीला उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे आढावा घेणार आहेत. तर 6 फेब्रुवारीला उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी राज ठाकरे रणनिती ठरवतील. त्याचबरोबर 11 फेब्रुवारीला दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ, 12 फेब्रुवारीला दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ, 13 फेब्रुवारीला उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ आणि 14 फेब्रुवारीला उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा राज ठाकरे घेणार आहेत.
मुंबईनंतर 8 आणि 9 फेब्रुवारीला राज ठाकरे यांचा नाशिक दौरा असणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन यंदा नाशिक मध्ये होणार आहे, तर नाशिकमध्ये पहिल्यांदाच मनसेचा वर्धापन दिन सोहळा होईल. मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त नाशिक मधील दादासाहेब गायकवाड सभागृहात 9 मार्चला मनसेचा मेळावा होती. त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनसे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेचा मेळावा महत्त्वाचा असल्याचं बोललं जातंय. लोकसभा निवडणुकीसाठी मनसे कोणासोबत युती, आघाडी करणार की स्वबळावर निवडणूक लढणार हे स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी मागील सभेत बोलल्याप्रमाणे 9 मार्च मेळाव्यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे 8 मार्चला काळाराम मंदिर मध्ये दर्शन घेणार आहेत. काळाराम मंदिरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही काही दिवसांपूर्वी दर्शन घेतलेले आहे. त्यामुळे आता राज ठाकरे यांचा नाशिक दौरा महत्त्वाचा ठरतो.