ठाकरेंचा आणखी एक शिलेदार साथ सोडणार; राजन साळवींच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!

Rajan Salvi: राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघातून राजन साळवींचा पराभव झाला होता.

Pravin Dabholkar | Updated: Feb 9, 2025, 08:54 PM IST
ठाकरेंचा आणखी एक शिलेदार साथ सोडणार; राजन साळवींच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला! title=
राजन साळवी

Rajan Salvi: राजन साळवी कोकणातील उद्धव ठाकरेंचे महत्त्वाचे शिलेदार.. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राजन साळवी हे पक्षातील नेत्यांवर नाराज असल्याच्या चर्चा होत्या. उद्धव ठाकरेंसोबतच्या एका बैठकीत त्यांनी विनायक राऊतांवर आरोप करत नाराजी सुद्धा व्यक्त केली होती.. मात्र, त्यांचं समाधान न झाल्यानं अखेर राजन साळवींनी ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतलाय...

राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघातून राजन साळवींचा पराभव झाला होता.. त्यानंतर साळवी हे पक्षातील कोकणातील नेत्यांवर नाराज आहेत. त्यांचं समाधान न झाल्यानं त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतलाय. येत्या 13 फेब्रुवारीला राजन साळवी हे ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत.

माजी आमदार राजन साळवींच्या शिवसेना पक्षप्रवेशाबाबत कुठलीही माहिती नसल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय. तर राजापूर लांजा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांना विश्वासात घेऊनच साळवींना पक्षप्रवेश देणं गरजेचं असल्याचं ही त्यांनी स्पष्ट केलंय. राजन साळवी यांची पदासाठी धडपड सुरु असून ते पक्षप्रवेशाची अफवा पसरवत आहेत. एकनाथ शिंदे हे कोकणातील शिवेसना नेत्यांना विश्वासात घेऊन साळवींना पक्षप्रवेश देतील, असा विश्वास शिवसेना आमदार किरण सामंत यांनी व्यक्त केलाय.

माजी आमदार राजन साळवी हे कोकणातील ठाकरेंच्या शिवसेनेचे महत्त्वाचे नेते आहेत. त्यांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानं हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय.

उदय सामंत काय म्हणाले?

या संदर्भामध्ये एकनाथ शिंदेसोबत माझी चर्चा झालेली नाही. आम्ही याच्यावर सविस्तर चर्चा करू. त्यानंतर ते पक्षांमध्ये येत असताना त्यांच्या काय इच्छा आकांक्षा आहेत, त्याच्यावर चर्चा होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.  किरण सामंतर त्यांचा पराभव करून निवडून आलेले आहेत.  त्यांनाही विश्वासात घेणे गरजेचे आहे. या सर्व गोष्टीचा विचार झाल्यावरच एकनाथ शिंदे निर्णय घेतील, असे ते म्हणाले. सगळ्या गोष्टी जाहीरपणे सांगायच्या नसतात पण एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी महाराष्ट्रात फार मोठी मुव्हमेंट सुरू आहे.त्याचे पडसाद तुम्हाला बघायला मिळतील, असे ते म्हणाले. माझ्याकडे 15 फेब्रुवारीला एकनाथ शिंदेंचा आभार दौरा आहे. त्यामध्येदेखील मोठे प्रवेश होणार आहेत. मला त्यांच्यावर काही बोलायचं नाही. शेवटी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात आम्हाला शिवसेना वाढवायची आहे.