Anandvan grant increase: कोविड काळानंतर आर्थिक कोंडीत सापडलेल्या आनंदवन सेवा प्रकल्पाला नवी उमेद मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुष्ठरोगी- वंचित आणि दुर्बल घटकांची सेवा करणा-या आनंदवनला 10 कोटी शाश्वत निधीची भेट दिली आहे. स्थापनेची 75 वर्षे पूर्ण करणा-या आनंदवनला कुष्ठरोग उपचार व पुनर्वसन अनुदानात घसघशीत वाढ मिळाली आहे. आनंदवन यामुळे अवयव दान- महिला सशक्तीकरण कामात नवे प्रकल्प उभारणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात कुष्ठरोग्यांची सेवा करण्यासाठी फक्त दोन झोपड्यांसह समाजसेवी बाबा आमटे यांनी 1948 मध्ये सुरू केलेला आनंदवन प्रकल्प आज सुमारे 5 हजार लोकसंख्येचे एक स्वयंपूर्ण गाव बनले आहे. प्रकल्पाची सर्व व्यवस्था महारोगी सेवा समिती, वरोरा द्वारे केली जात आहे. आज, रुग्णालयाव्यतिरिक्त, येथे अनाथाश्रम, शाळा आणि महाविद्यालय, अंध आणि अपंगांसाठी शाळा, हातमाग, हस्तकला, शिवणकाम, ग्रीटिंग कार्ड आणि प्रिंटिंग प्रेस असे विविध उपक्रम राबविले जातात.
स्वरानंदवन हा सुमारे 150 शारीरिकदृष्ट्या अपंग लोकांचा एक ऑर्केस्ट्रा आहे. आनंदवनाची इतर काही वैशिष्ट्ये म्हणजे आनंदवनाची बांधणी आणि त्याचा प्रवासही ''माणूस'' निर्माण करणाऱ्या लोकांचा आहे. बाबा आमटे व त्यांच्या पत्नी साधनाताई आमटे यांच्या पश्चात डॉ. विकास आमटे, डॉ. प्रकाश आमटे व आता आनंदवनातील तिसरी पिढी या प्रकल्पाचे व्यवस्थापन बघत आहे. मात्र वार्षिक 25 कोटी रुपये या खर्चाचा ताळमेळ बसविताना कोविड काळानंतर या प्रकल्पाला आर्थिक संकट झेलावे लागले.
यंदा प्रकल्पाची पंचाहत्तरी पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कोविड काळानंतर पहिल्यांदाच आनंदवन मित्र मेळ्याचेजन करण्यात आले. दोन दिवस यात विविध चर्चात्मक व पुढील 25 वर्षांच्या वाटचालीच्या दृष्टीने उपक्रम आखणी संदर्भात साधक बाधक चर्चा झाली. समारोप कार्यक्रमाला आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंदवनाची आर्थिक कोंडी लक्षात घेता कुष्ठरोग्यांच्या उपचार पुनर्वसनात घसघशीत वाढ व आनंदवनच्या कॉर्पस फंड मध्ये दहा कोटी रुपयांची मदत जाहीर केली.
कुष्ठरोगी व वंचितांसाठी गेली 75 वर्षे काम करणाऱ्या संस्थेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दिलेल्या पाठबळाबद्दल आनंदवनने आभार व्यक्त केले आहेत. पंचाहत्तरीच्या निमित्ताने 75 कोटी रुपये शाश्वत निधी उभारण्याचे ठरले आहे. त्यातील दहा कोटी रुपये राज्य शासनाने देऊ केले असून इतरही रकमेबाबत मदतीचा हात पुढे करण्यात आल्याने सध्या तरी आनंदवनावरील संकट टळले आहे. आगामी काळात महिला सशक्तिकरण ,अवयव दान व सुसज्ज रुग्णसेवा याबाबत आनंदवन प्रकल्प आता आत्मविश्वासाने पावले टाकणार आहे.
एखाद्या प्रकल्पाच्या वाटचालीतील पंच्याहत्तरी हा एक मैलाचा दगड आहे. त्यातही केवळ मदतीवर चालणाऱ्या आनंदवन सारख्या संस्थांचा हा प्रवास अधिक लक्षवेधी आहे. या टप्प्यावर निर्धारपूर्वक पावले टाकत नवी वाट चोखाळण्यासाठी आनंदवन सज्ज आहे..काही काळ आकाश काळवंडल्यानंतर पुन्हा एकदा तेजाने उजळण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.