संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण, न्याय कधी? जाणून घ्या हत्या प्रकरणाचा घटनाक्रम

संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटले, आंदोलनं झाली. मात्र देशमुख कुटुंब अजुनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Feb 9, 2025, 08:21 PM IST
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण, न्याय कधी? जाणून घ्या हत्या प्रकरणाचा घटनाक्रम title=

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येला आता 2 महिने झालेत. हत्येप्रकरणी पोलीस, सीआयडी पथकं तपास करतायेत. मात्र हत्येतील एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांना सापडलेला नाहीये. हत्या प्रकरणानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटले, आंदोलनं झाली. मात्र देशमुख कुटुंब अजुनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. 

दोन महिने पूर्ण, न्याय कधी?

जन्मदात्या बापाची क्रूर हत्या झाल्याच्या घटनेला 2 महिने उलटून गेल्याचं सांगताना वैभवीला अश्रू अनावर झाले. 9 डिसेंबर 2024ला संतोष देशमुखांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. आरोपींना पकडलं असलं तरी मास्टरमाईंड अद्यापही समोर आलेला नाही. तर एक आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. 

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा घटनाक्रम

- 9 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून छळ करून हत्या केली
- 10 डिसेंबरला आरोपींच्या अटकेसाठी तब्बल 12 तास अहमदपूर-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम करण्यात आला
- 10 डिसेंबरलाच जयराम चाटे आणि महेश केदार या 2 आरोपींना अटक करण्यात आली
- 11 डिसेंबरला तिसरा आरोपी प्रतिक घुलेला रांजणगावमधून अटक करण्यात आली
- 11 डिसेंबरलाच मस्साजोग गावात शरद पवारांनी दौरा करून देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली
- 11 डिसेंबरला आवादा पवनचक्की खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेवर गुन्हा दाखल करण्यात आला
-  13 डिसेंबरला संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली
- 14 डिसेंबर 2024ला केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं
- 14 डिसेंबरला देशमुख हत्या प्रकरणाचे विधीमंडळात पडसाद उमटले
- 18 डिसेंबरला आरोपी विष्णू चाटेला अटक करण्यात आली
- 21 डिसेंबरला मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानं पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करण्यात आली
- 21 डिसेंबरला नवनीत कॉवत यांची पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली
- 24 डिसेंबरला आवादा पवनचक्की खंडणी प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला
- 30 डिसेंबरला वाल्मिक कराडच्या अटकेसाठी अंजली दमानियांनी आंदोलन केलं
- 31 डिसेंबरला वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीला शरण आला
- 4 जानेवारी 2025ला आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पुण्यातून अटक करण्यात आली
- 11 जानेवारीला देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर मकोका लावण्यात आला

संतोष देशमुखांच्या हत्येला २ महिने पूर्ण झाले असले तरी अद्यापही याप्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे सापडलेला नाही. यावरूनच खासदार संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधलाय.

न्याय मिळण्यासाठी देशमुख कुटुंबीय गेल्या २ महिन्यांपासून प्रतिक्षेत आहे. रस्त्यावरच्या लढाईपासून ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीपर्यंत त्यांनी सर्व प्रयत्न केले. राज्यातील अनेक शहरात देशमुख हत्येच्या निषेधार्थ मोर्चेही निघालेत. मात्र कृष्णा आंधळे अजूनही सापडलेला नाही. आरोपींना अटक झाली आम्हाला न्याय कधी मिळणार, असा सवाल देशमुख कुटुंबीय विचारतंय.