निलेश वाघ ,झी मीडिया, मनमाड : वीज कंपनीच्या गलथान कारभारामुळे दोन दिवसांपासून मनमाड शहरातील अनेक भागात वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिक अंधारात आहेत. वीज कंपनीकडून वीज पुरवठा सुरळीत केला जात नसल्याने शिवसेना-भाजप कार्यकत्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. संतप्त झालेल्या शिवसेना - भाजप कार्यकर्त्यांनी मध्यरात्री दोन वाजता इंदूर-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.
सलग दोन दिवस झालेल्या वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. वीज पुरवठा कधीपर्यंत पूर्ववत होईल याची माहिती वीज कंपनीकडून अद्याप मिळाली नाही. अखेर शिवसेना - भाजप कार्यकर्त्यांनी वीज कंपनीच्या विरोधात घोषणाबाजी देत चक्क रात्री २च्या सुमारास रास्ता रोको आंदोलन केले.
मध्यरात्री अचानक झालेल्या आंदोलनामुळे पोलिस प्रशासनाची धावपळ उडाली. अर्धा तास सुरू असलेल्या रास्ता रोकोमुळे दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती. अखेर आज दुपारपर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले .
मनमाड शहरातील अनेक भागातील वीज वाहक तारा जुनाट झाल्या आहेत. वीज कंपनीकडून पावसाळ्यापूर्वी कुठलीही कामे केली जात नाहीत. त्यामुळे थोडा पाऊस जरी झाला तर वीज पुरवठा खंडित करण्यात येतो. वीज कंपनीच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप आंदोलक कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.