हेमंत चापुडे, झी २४ तास, आंबेगाव : घरच्या गरिबीमुळं अनेकांना आपलं शिक्षण अर्धवट सोडावं लागतं. अशा मुलांसाठी नवा आदर्श निर्माण केलाय तो आंबेगावच्या शंकर घोरपडेनं... ऊसतोड कामगाराच्या या मुलानं दहावीच्या परीक्षेत तब्बल ९३.८० टक्के गुण मिळवून यशाचा झेंडा रोवलाय... त्याची ही संघर्षकहाणी...
गरीबी शिक्षणाच्या आड येत नाही... आंबेगावच्या शंकर घोरपडेनं ते सिद्ध करून दाखवलं... जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतंही यशाचं शिखर गाठता येतं, हे या लहानग्या शंकरनं दाखवून दिलं. साखर कारखान्यात ऊसतोडणीचं काम करणाऱ्या मजुराचा हा मुलगा... दुष्काळी भागातून कामाच्या शोधात आलेल्या शेकडो मजुरांपैकीच हे घोरपडे कुटुंब...
गावचं घरदार, शेतीवाडी सोडून ऊसतोड कामगार म्हणून ही मंडळी काम करतात. त्यात मुलांच्या शिक्षणाची मोठी फरफट होते... गेल्या १६ वर्षांपासून भागवत घोरपडे आंबेगावच्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यात कामाला आहेत. कारखान्याच्या जागेत बांधलेल्या तात्पुरत्या खोपटामध्ये त्यांचं कुटुंब राहतं... तिथंच शंकर अभ्यास करायचा. पारगावच्या श्री संगमेश्वर माध्यमिक विद्यालयाचा हा विद्यार्थी... सकाळी शाळेत जाण्यापूर्वी आई-वडिलांना ऊसतोडणीच्या कामात मदत आणि संध्याकाळी घरी आल्यावर अभ्यास अशी दुहेरी मेहनत तो करायचा... त्याच्या या कष्टांचं अखेर चीज झालं. दहावीच्या परीक्षेत ९३.८० टक्के गुण मिळवून त्यानं यशाचा झेंडा फडकवला.
काबाडकष्ट आणि मेहनत करून शंकरनं जिद्दीनं हे यश मिळवलं... त्याच्या यशाचं आता सर्वत्र कौतुक होत असून, भीमाशंकर साखर कारखान्यानं मदतीचा हात पुढं केलाय... पण शंकरला आपली पुढची स्वप्नं साकार करायचीत... त्याचा संघर्ष अजून संपलेला नाही... आता प्रतीक्षा आहे ती तुमच्यासारख्या मदत देणाऱ्या हातांची...
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश मिळवणाऱ्या या गरजू, गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत पाठवण्यासाठी थेट त्यांच्याच नावे पुढील पत्त्यावर धनादेश पाठवा
झी २४ तास, मॅरेथॉन फ्युचरेक्स, १४ वा मजला, ए विंग, ना म जोशी मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४०० ०१३
संपर्क क्रमांक - ९३७२९३७५६९