PM Narednra Modi : अयोध्येत बांधलेल्या राम मंदिरातील रामलल्लाच्या मूर्तीची 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी बोलताना स्वामी गोविंदगिरी महाराजांनी पंतप्रधान मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली होती. यावरुन अनेकांनी आक्षेप घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जिद्द छत्रपती शिवाजींसारखी असल्याचे गोविंदगिरी महाराजांनी म्हटले होतं. त्यावर आता ठाकरे गटाने टीका केली आहे. भाजपच्या संत-महंतांनी पंतप्रधान मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. हा अतिरेकच आहे. शिवाजीराजांनी स्वराज्य व लोकशाहीची सांगड घातली, असे टीका सामनातून करण्यात आली आहे.
काय म्हणाले होते गोविंदगिरी महाराज?
"छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे महापुरूष आपल्याला ( नरेंद्र मोदी ) मिळाले आहेत. ज्यांना जगदंबा मातेनं हिमालयातून भारत मातेच्या सेवेसाठी पाठवलं आहे. रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराज यांचं वर्णन, ‘निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंतयोगी," असं गोविंदगिरी महाराजांनी म्हटले होतं.
रोखठोकमधून टीका
रामजन्मभूमीवर श्रीरामाचे मंदिर उभे राहिले व मोदीभक्त भलतेच भावुक झाले. पंतप्रधान मोदींनाही अश्रू अनावर झाले. या भावुकपणातही शेवटी ढोंगच दिसले. मंदिर उद्घाटन सोहळ्यात श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांनी पंतप्रधान मोदी यांना छत्रपतींच्याच घोड्यावर चढवले. पंतप्रधान मोदी हे छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे श्रीमान योगी आहेत. भाजप नेत्यांचे व भाजपपुरस्कृत संत-महंतांचे म्हणणे असे की, मोदी हे शिवाजीराजेच आहेत व ते नसते तर अयोध्येत राममंदिर उभेच राहिले नसते. थोडक्यात, भाजपच्या संतांनी आता मोदी यांना ‘शिवाजी’ केले. मोदी कधी श्रीराम, कधी विष्णूचे तेरावे अवतार, तर कधी छत्रपती शिवराय असतात. ते फक्त देशाचे कर्तव्यतत्पर, धाडसी पंतप्रधान नसतात. मोदींची तुलना जे छत्रपती शिवरायांशी करतात ते एक प्रकारे शिवरायांचाच अपमान करत आहेत. शिवरायांनी तलवारीच्या बळावर मोगली आक्रमणाशी सामना केला. त्यांच्या हातात राज्य आयते पडले नाही. ‘ईव्हीएम’ व श्रीमंत सावकारांच्या बळावर त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले नाही. ‘ईव्हीएम’ हे भाजपचे सुदर्शन चक्र आहे. ते नसेल तर मोदी व त्यांच्या पक्षाचे काय होईल? याचा खुलासा मोदींना घोड्यावर बसवणाऱ्यांनी करायला हवा, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.
शिवचरित्राची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही
भारतीय जनता पक्षाला शिवचरित्राचे वावडे आहे. कारण शिवचरित्र हा चारित्र्याचा आदर्श आहे. शिवचरित्र म्हणजे राष्ट्र आणि प्रजा कल्याणासाठी आयुष्याचा केलेला होम आहे. शिवचरित्राची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. शिवाजीराजे म्हणजे शिवाजीराजे. दुसरे नाव उच्चारायला जीभ तयारच होत नाही. पण भाजपच्या संतांनी मोदींना शिवाजीराजे, श्रीमान योगी करून टाकले. शिवाजीराजांशी तुलना व्हावी असे कोणते अचाट काम पंतप्रधान मोदी यांनी केले? हे भाजपचे संत-महंत सांगू शकणार नाहीत. पण छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनी काय केले असते?
स्वराज्यात मणिपूरसारखे एखादे राज्य हिंसेच्या आगीत होरपळत असताना शिवाजीराजे स्वस्थ बसले नसते. आपल्या राज्यातील प्रजेत दोन गट पडून ते एकमेकांच्या रक्ताचे प्यासे बनले आहेत हे पाहून त्यांनी मणिपुरात कूच करून शांतता प्रस्थापित केली असती. निर्वासितांच्या छावण्यांत ते फिरलेच असते व शांतता पूर्ण प्रस्थापित होईपर्यंत त्यांनी मणिपुरातच राहुट्या ठोकल्या असत्या. मणिपुरात अशांतता प्रस्थापित करणाऱ्या परक्या शक्तींचा बीमोड केला असता. हिंदू आणि मुसलमान असा राजकीय स्वार्थाचा भेदाभेद त्यांनी केला नसता. बलात्कारी, गुन्हेगार हिंदू आहे की मुसलमान हे पाहून त्यांनी न्याय केला नसता व न्यायाच्या नावाखाली गरीब मुसलमानांच्या घरांवर बुलडोझर फिरवून लोकांना बेघर केले नसते. न्याय करतानाच त्यांनी तटस्थतेचे दर्शन घडवले असते. स्वराज्याची सर्व मालमत्ता आपल्या सावकार मित्राच्या हवाली करून ‘गरिबी हटाव’च्या पोकळ वल्गना शिवरायांनी कधीच केल्या नसत्या, असेही ठाकरे गटानं म्हटलं आहे.
जेव्हा राजा इमानदार असतो तेव्हा सैन्यास पराभवाची चिंता नसते
लडाखमध्ये चीन घुसला आहे. कश्मीरात ‘पंडित’ हिंदूंना त्यांच्या घरी जाता येत नाही. मणिपूर अशांत आहे. कारण पंतप्रधान पेशव्यांप्रमाणे पूजा, व्रतवैकल्ये, अनुष्ठानांत गुंतले आहेत. शिवाजी महाराज हिंदू रक्षक होतेच, पण ते सदैव ‘धर्म’, ‘देव देव’ करीत पूजेला बसले असते तर ते आग्य्राच्या कैदेतून सुटले असते काय व मोगलांना पळवून लावले असते काय? शिवरायांचे स्वराज्य हे पैशांतून, खोटेपणातून, ‘ईव्हीएम’च्या घोटाळ्यातून निर्माण झाले नव्हते. त्यांना भवानी मातेचा प्रसाद लाभला. तो प्रसाद त्यांनी शौर्य म्हणून देश व प्रजेसाठी वापरला. शिवाजी महाराज गेले तरी मावळे लढत राहिले. जेव्हा राजा इमानदार असतो तेव्हा सैन्यास पराभवाची चिंता नसते. शिवचरित्राचे हेच सार आहे. मोदींची शिवचरित्राशी तुलना करणाऱ्या भाजपच्या संत-महंतांनी शिवचरित्र समजून घेतले पाहिजे, पण त्यांना ते समजणे अवघड आहे!, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.