मुंबई : सोमवारी म्हणजे उद्या पुण्यातील शाळांची घंटा वाजणार आहे. उद्यापासून शहरातील ९ ते १२ वी चे वर्ग सुरू करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाने दिल्या आहेत. पुण्यातील कोरोना परिस्थितीत तसेच पालकांची मानसिकता लक्षात घेऊन शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय याआधी दोनदा पुढे ढकलण्यात आला होता.
आता मात्र राज्यात सर्वत्र शाळा सुरू झाल्या असताना पुण्यातील शाळा देखील सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्या दृष्टिकोनातून सर्व प्रकारची तयारी शाळांकडून करण्यात आलीय. फिजिकल दिस्टांसिंग तसेच स्वच्छते विषयीचे नियम पाळून वर्ग भरवले जाणार आहेत. महत्वाचं म्हणजे पालकांची संमती घेऊनच मुलांना शाळांमध्ये पाठवलं जाणार आहे. त्यामुळे उद्या शाळांमध्ये कितपत उपस्थिती बघायला मिळते ते उद्याच कळणार आहे.
नाशिक जिल्ह्यात शाळांना सुरुवात होणार आहे. नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग उद्यापासून पुन्हा एकदा भरले जाणार आहेत. नाशिक शहरातल्या 206 शाळांमध्ये सुरू होतील. आता साऱ्यांचे लक्ष उद्या सुरू होणाऱ्या शाळांकडे लागून राहिले आहे.
मार्च महिन्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे लॉकडाउनचा निर्णय जाहीर करण्यात आला. मुंबईतील बंद झालेल्या शाळा नवीन वर्षातच उघडणार आहेत. राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्यात शाळा उघडण्यास परवानगी दिली होती. मात्र, मुंबई महापालिकेने शाळा लगेचच उघडण्यास नकार दिला. तसेच पालकांचाही फारसा सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने महापौर मुरलीधर मोहोळ आणि महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी दोन वेळा शाळा सुरू करण्यास मुदतवाढ दिली होती.
या शाळा चार जानेवारीपासून सुरू करण्याचे आदेश देण्यात आले असून, शाळा प्रशासनास पुरेसा कालावधी मिळावा म्हणून हा निर्णय दहा दिवस आधी जाहीर करण्यात आला आहे. करोनाचा दुसरी लाट, ब्रिटनमधील नवीन करोना विषाणू, या पार्श्वभूमीवर पालकांकडून किती सकारात्मक प्रतिसाद मिळेल, याबाबत प्रशासनालाही शंका आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पालकांच्या संमतीने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.