शिवसेना नसती तर काल रामाची प्राणप्रतिष्ठा झाली नसती असं संजय राऊत म्हणाले आहेत. शिवसेना राज्यव्यापी अधिवेशनास सुरूवात झाली असून यावेळी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची तुलना रामाशी केली. रामाकडे जो संयम होता, तोच संयम उद्धव ठाकरेंकडे आहे असंही ते म्हणाले आहेत. भाजपात विष्णुचा तेरावा अवतार जन्माला आला आहे. तुम्ही तुमच्या विष्णूला पुजा आम्ही आमच्या रामाला पूजतो असंही उपहासात्मकपणे ते म्हणाले. यावेळी त्यांनी आजचा रावण अजिंक्य नाही सांगत अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. तसंच स्वत:ला हनुमानाची उपमा दिली.
"राम आला की रावण येतो. पण आता जागोजागी रावणच दिसत आहेत. दिल्लीत, नाशिकमध्ये सगळीकडेच आहेत. आजचा रावण अजिंक्य आहे असं वाटत आहे. पण तो रावणही अजिंक्य नव्हता आणि हादेखील नाही. त्या रावणाला बालीने हरवलं होतं. रावणाचं मुंडकं पकडून धिंड काढली होती आणि मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे रावण अजिंक्य आहे हा गैरसमज काढून टाका. हे सत्य होणार आहे. कारण मी रामभक्त आहे. प्रभूंना खरं वाटणार नाही. माझ्या पाठीशी प्रभू आहेत, पण मी रामभक्त आहे," असं संजय राऊत म्हणताच उद्धव ठाकरेंसह उपस्थितांमध्ये हशा पिकला.
संजय राऊतांनी यावेळी आपल्याला हनुमानाची उपमा दिली. "हनुमान लंकेत सीतेचा शोध घेण्यासाठी पोहोचला होता. हनुमानाला अटक झाली होती. रावणाचे सैनिक त्याला जेरबंद करुन रावणाच्या दरबारात घेऊन गेले. रावण हसला आणि मला ओळखत नाही का? अशी विचारणा केली. त्यावर हनुमानाने बालीने तुला मारण्याचा प्रयत्न केला होता असं सांगितलं. हनुमानाने असं सांगितलं कारण त्याला रावणाचा आत्मविश्वास कमी करायचा होती. शत्रूचा आत्मविश्वास आधी कमी करायला हवा," असं आवाहन संजय राऊतांनी केलं.
"रामाशी आमचे जुने नाते आहे. एका व्यक्तीचे किंवा पक्षाचे असते असे नाही. शिवसेना नसती तर पंतप्रधानांना काल अयोध्येत जाता आले नसते. आज या कुरूक्षेत्रावरून लढाई सुरू करत आहोत. रामाचा सर्वाधिक संघर्ष इथं पंचवटीत झाला आहे. रामाचा जो संयम आहे तो उद्धव ठाकरेंचा संयम आहे. धैर्य होतं म्हणून शिवसैनिकांनी घुमट पाडले. भाजपाकडे धैर्य नव्हते म्हणून त्यांचे मशिद पडल्यावर धैर्यही पडले," असा टोला संजय राऊतांनी लगावला.
"दिल्लीतील रावणशाहीसमोर झुकणार नाही. रामायण अयोध्येत कमी व या पंटवटीत घडले. शुर्पणखेचे नाक हे इथंच कापले गेले. नाशिकमध्ये एका होर्गिगवर संयमी योद्धा असं लिहिलं होतं, त्याने माझं लक्ष वेधून घेतलं. ही उपाधी प्रभू श्रीरामाला शोभून दिसत होती. ती आता उद्धव ठाकरेंना शोभून दिसत आहे. कल्याणमध्ये उद्दव ठाकरेंचं रामाप्रमाणे स्वागत झालं. मला तर वाटतंय की आता प्रभू रामाच्या दुसऱ्या हातात मशाल येईल. रामालाही वाटेल आता धनुष्य नको. महाराष्ट्राला नव्हे तर देशाला एक प्रकाशमान केल्याशिवाय राहणार नाही," असं संजय राऊत म्हणाले.
शिवसेनेत रामाचा प्राण आहे. भाजपात विष्णुचा तेरावा अवतार जन्माला आला आहे. तुम्ही विष्णूला पुजा आम्ही आमच्या रामाला पूजतो. विष्णुचं धैर्य कुंपणावरचं आहे. रामाचं धैर्य असत्याविरोधात, नितिमत्तेसाठी पुकारलेलं आहे. रामावर अन्याय झाला तेव्हा त्यांना भडकावण्याचे प्रयत्न झाले नसतील का? पण राम शांत राहिला आणि संधीची वाट पाहत राहिला. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेही संधीची वाट पाहत आहेत,' असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे.