Pune Street Vendors: पुण्यात अतीक्रमपण विरोधी कारवाई सुरु असताना पालिकेच्या सुरक्षारक्षकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. फेरीवाल्यांकडून पालिकेच्या सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. पुण्यातील क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत अतीक्रमण कारवाई सुरु असताना सुरक्षारक्षकाला मारहाण झाली. अनाधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई केली जात असताना त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यावर हात उचलला. ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
व्हिडीओत काही तरुण सुरक्षाकर्मचाऱ्यावर हल्ला करताना दिसत आहेत. यावेळी दोघा-तिघांनी त्याला पकडलेला असून बुक्क्या मारत होते. तसंच एकाने तर हातातील पलीताही कर्मचाऱ्याच्या डोक्यात घातला. यादरम्यान एक तरुण मात्र हे भांडण थांबवण्याचा प्रयत्न करत होता. तो सुरक्षा कर्मचाऱ्याला दूर नेण्याचा प्रयत्न करत असताना काही तरुण पुन्हा त्याच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न करतात.
ढोले पाटील असं या सुरक्षा कर्मचाऱ्याचं नाव असून क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत अतीक्रमणविरोधी कारवाई सुरु होती. अतीक्रमण निरीक्षकांच्या नेतृत्वात अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई केली जात होती. मात्र यावेळी ढोले पाटील यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
दरम्यान या मारहाणीविरोधात अतीक्रमण विभाग उद्या बंद पाळणार आहे. तसंच पालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेत संपूर्ण हकीकत सांगणार आहेत. अतीक्रमण विरोधी कारवाई करताना कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण दिलं जात नसून, हा मुद्दा ते आयुक्तांसमोर मांडण्याची शक्यता आहे. दरम्यान, सुरक्षारक्षक आणि अतीक्रमण विभागाचे अधिकारी या मारहाणीविरोधात पोलीस तक्रार करणार आहेत.