औरंगाबाद : जायकवाडीला पाणी न सोडण्याची विखेपाटील कारखान्याची याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळलीय. त्यामुळे आता नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातून पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झालाय. नाशिक आणि अहमदनगरमधून ९ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडण्याचा निर्णय आधीच झाला आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उद्या सकाळी ८.०० वाजता निळवंडे धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यात येणार आहे.
निळवंडे धरणातून ३.८५ टीएमसी आणि मुळा धरणातून १.९० टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. निळवंडे धरणातून सुरवातीला ६००० क्यूसेकने पाणी सोडण्यात येणार आहे.
नंतर ४ तासांनी २००० क्युसेक आणि पुन्हा ४ तासांनी २००० क्युसेक असा १०,००० क्युसेकने पाणी सोडण्यात येईल.
सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असल्याने कुणीही आंदोलन करून विसर्गास अडथळा आणू नये, असं आवाहन जलसंपदा विभागातर्फे करण्यात आलंय. तसेच नदीतील प्रवाह जास्त असल्याने कुणीही नदीपात्रात उतरू नये, तसेच कुणाचे विद्यूत पंप जर नदीपात्रात असतील तर ते सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात यावेत, असंही पत्रकात म्हटलं गेलंय.