Pune University Clash : पुणे विद्यापीठ आवारात भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी संघटना आणि डावे पक्षप्रणीत स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या दोन संघटनांमध्ये तुफान हाणामारी झाली. त्याला कारण ठरलं ते विद्यापीठ परिसरात मोदींविरोधात लिहिण्यात आलेला आक्षेपार्ह मजकूर... विद्यापीठ वसतीगृहाच्या पार्किंगमध्ये मोदींबाबत आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला होता. त्याविरोधात अभाविप आक्रमक झाली आणि विद्यापीठ आवारात आंदोलन सुरु झालं. मात्र त्याचवेळी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचे पदाधिका-यांनी सभासद नोंदणी सुरु केली. त्यामुळे दोन्ही संघटनांमध्ये बाचाबाची सुरु झाली आणि त्याचं रुपांतर पुढे हाणामारीत झालं. त्यावरून आता राज्याच्या राजकारणात देखील चर्चेला उधाण आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खडे बोल सुनावले आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भाजपाप्रणीत विद्यार्थी संघटनेच्या मुलांनी दुसऱ्या विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांना मारहाण केली आणि त्यानंतर विद्यापीठात आंदोलन करायला सुरुवात केली. पुणे हे 'विद्येचे माहेरघर' म्हणून ओळखले जाते. या शहरात कोणत्याही शैक्षणिक परिसरात अशा पद्धतीने राजकारणाचे खेळ करणं सत्ताधारी पक्षाला शोभत नाही. शैक्षणिक परिसराचे पावित्र्य आणि शांतता भंग करण्याचा अधिकार या लोकांना नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात खेड्यापाड्यातून आलेल्या गरीब विद्यार्थ्यांना मारहाण करणारे गुंड विद्यापीठात कसे घुसले आणि त्यांनी कोणत्या अधिकाराने मुलांना मारहाण केली याची कसून चौकशी होण्याची गरज आहे. गृहमंत्र्यांचे या गुंडगिरीला अभय आहे का? याचाही खुलासा यानिमित्ताने व्हायला हवा. विद्यापीठाच्या कुलगुरू महोदयांनी याबाबत तातडीने निर्णय घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी देखील सुळे यांनी केली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भाजपाप्रणीत विद्यार्थी संघटनेच्या मुलांनी दुसऱ्या विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांना मारहाण केली आणि त्यानंतर विद्यापीठात आंदोलन करायला सुरुवात केली. पुणे हे 'विद्येचे माहेरघर' म्हणून ओळखले जाते. या शहरात कोणत्याही शैक्षणिक परिसरात अशा…
— Supriya Sule (@supriya_sule) November 3, 2023
दरम्यान, या हाणामारीनंतर दोन्ही संघटनांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले. पुण्याला विद्येचं माहेरघर म्हटलं जातं. पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुलेंचं नाव आहे. तिथे विद्यार्थी संघटनांमध्ये राडा होणं नक्कीच दुर्दैवी म्हणावं लागेल. यापूर्वी जेएनयूमध्ये डाव्या विद्यार्थी संघटना विरुद्ध भाजपप्रणीत अभाविप असा संघर्ष उफाळून आला होता. आता नेमक्या तशाच पद्धतीची राडेबाजी पुण्यात दिसून आलीय. त्यामुळे पुणे विद्यापीठाचं जेएनयू होतंय का अशी चर्चा सुरु झालीये.