ती पोस्ट वैयक्तिक, शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही-संजय राऊत

आत्तापर्यंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वाद हे एक समीकरणच होतं. हे समीकरण बाळासाहेबांच्या पश्चातदेखील शमण्याचे नाव घेताना दिसत नाही.  

Updated: Dec 27, 2018, 07:15 PM IST
ती पोस्ट वैयक्तिक, शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही-संजय राऊत  title=

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून ज्या सिनेमाच्या ट्रेलरची प्रतिक्षा होती, त्या 'ठाकरे' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. आत्तापर्यंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वाद हे एक समीकरणच होतं. हे समीकरण बाळासाहेबांच्या पश्चातदेखील शमण्याचे नाव घेताना दिसत नाही. काल बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' या जीवनपटाचा ट्रेलर सोहळा पार पडला. यानंतर खऱ्या अर्थाने या वादाला सुरुवात झाली. हा ट्रेलर प्रदर्शित होण्याआधी सेंन्सॉरने बाबरी मशिद आणि दाक्षिणात्यांबद्दलच्या संवादाबद्दल आक्षेप घेतला होता. त्यामुळे या ट्रेलरची सुरुवातच वादग्रस्त राहिली. हा वाद कमी होता की काय म्हणून दुसरा वाद उभा राहिला आहे.

नक्की प्रकरण काय ?

त्याचं झालं असे की, काल ठाकरे सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. हा सिनेमा चित्रपटगृहात २५ जानेवारीला मराठी आणि हिंदी या दोन भाषेत प्रदर्शित होणार आहे. यावर, शिवसेना चित्रपटसेनेच्या बाळा लोकरे यांनी एक फेसबुक पोस्ट टाकली होती. यात ते म्हणाले की, २५ जानेवारीला 'ठाकरे' सिनेमाशिवाय इतर कोणताही सिनेमा चालू देणार नाही. अशी तंबीच या पोस्टमध्ये  देण्यात आली. ही फेसबुक पोस्ट समाजमाध्यमांवर चांगलीच चर्चिली गेली. या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर यावर सिनेमाचे निर्माते आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

काय होती पोस्ट

शिवसेना चित्रपटसेनेच्या बाळा लोकरे यांची फेसबुक पोस्ट

 

अधिकृत भूमिका

या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, बाळासाहेब हा सर्वांसाठी भावनेचा विषय आहे. ती फेसबुक पोस्ट त्या कार्यकर्त्याचे वैयक्तिक मत आहे. शिवसेनेची तशी अधिकृत भूमिका नाही.

अंजली दमानिया यांचे ट्विट डिलीट

या वादग्रस्त फेसबुक पोस्टसंदर्भात संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतरही हा वाद शमण्याची चिन्हे दिसत नाही. सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी ट्विट करुन या फेसबुक पोस्टवर विरोध नोंदवला. त्यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून एक ट्विट केले आहे, त्यात त्या म्हणाल्या की. "माननीय मुख्यमंत्री, आपण लोकशाही असलेल्या देशात राहतो, आपल्या इथे कायद्याचे राज्य आहे की हुकूमशाहीचे. २५ जानेवारीला  ठाकरे सिनेमाशिवाय एकही सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, असं म्हणण्याची हिम्मत कशी होते? अशांना तुरुंगात टाकायला हवं. पण तुम्हाला आगामी निवडणुकीत शिवसेनेची गरज लागणार आहे, त्यामुळे तुम्ही कारवाई करणार की नाही याबद्दल साशंकता आहे." अशा आशयाचे ट्विट अंजली दमानिया यांनी केले होते. पण त्यांचे या प्रकरणाबाबत समाधान झाल्याने त्यांनी हे ट्विट डिलीट केले आहे.