भर रस्त्यात भटक्या कुत्र्यांचा महिलेवर जीवघेणा हल्ला, चावा घेत फरफटत नेले आणि...

Titwala Stray Dogs Attacked: कुत्र्यांच्या झुंडीने एका महिलेवर प्राणघातक हल्ला केला. तिच्या शरीरावर चहुबाजून चावा घेत तिला फरफटत ओढत नेले.

Pravin Dabholkar | Updated: Dec 7, 2024, 04:04 PM IST
भर रस्त्यात भटक्या कुत्र्यांचा महिलेवर जीवघेणा हल्ला, चावा घेत फरफटत नेले आणि... title=
महिलेवर कुत्र्यांचा हल्ला

Titwala Stray Dogs Attacked: भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालल्याचे दिसून येत आहे. याची प्रचिती टिटवाळा येथे आली आहे. टिटवाळ्यातील रिजेन्सी सर्वम परिसरात भटक्या कुत्र्यांनी एका महिलेवर हल्ला केलाय.रिजेन्सी सर्वम येथील बिल्डिंग नंबर 8 व 9 च्या मागील बाजूस काल रात्री एका महिलेवर परिसरातील भटक्या कुत्र्यांनी जोरदार हल्ला केला.या हल्ल्यात सदरील महिला अत्यंत गंभीर जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी गोवेली प्राथमिक रुग्णालय येथे नेण्यात आले. अद्याप या महिलेची ओळख पटलेली नाही. 

कुत्र्यांच्या झुंडीने एका महिलेवर प्राणघातक हल्ला केला. तिच्या शरीरावर चहुबाजून चावा घेत तिला फरफटत ओढत नेले. ती ओरडत राहिली पण कुत्रे तिला चावतच राहिले. कुत्र्यांच्या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या व्हायरल होतंय. या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण आहे. संबंधित अधिकारी घटनेची चौकशी करत आहेत.  

शुक्रवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. टिटवाळा येथील रिजन्सी कॉम्प्लेक्सच्या आवारात एका 68 वर्षीय महिलेवर कुत्र्यांच्या टोळीने अचानक हल्ला चढवला. एवढेच नव्हे तर कुत्र्यांनी महिलेला 50 मीटर अंतरापर्यंत ओढून नेले. त्यानंतर काही लोक धावत आले, त्यांना पाहताच कुत्रे महिलेला सोडून पळून गेले. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे.

महिलेची प्रकृती अत्यंत गंभीर 

जखमी महिलेला गोवेली शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री तीन वाजण्याच्या सुमारास जखमी महिलेला गोवेली रुग्णालयात आणण्यात आले. महिला गंभीर जखमी झाली आहे. तिच्या डोक्यावर, पायावर आणि हातावर खोलवर जखमा झाल्यामुळे ती काही बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याची माहिती डॉ.दीपलक्ष्मी कांबळे यांनी दिली. महिलेवर प्राथमिक उपचार करण्यात आले आणि त्यानंतर लगेचच या महिलेला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी तिला कळवा रुग्णालयात पाठवले. तेथून आता तिला मुंबईतील जेजे रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

लोकांकडून राग आणि चिंता व्यक्त 

परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत असून त्यामुळे लहान मुले, वृद्ध आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवून पुरेशी सुरक्षा व्यवस्था करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.