Video Fadnavis Face To Face With Aaditya Thackeray: विधानसभेचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. या विशेष अधिवेशनामध्ये सर्व नवनिर्वाचित सदस्यांना आमदारकीची शपथ दिली जाणार आहे. सकाळपासूनच विधानसभेच्या आवारामध्ये पूर्वतायरीची लगबग दिसून येत होती. सकाळी दहा वाजल्यापासून नवनिर्वाचित सदस्य विधानसभेत दाखल होऊ लागले. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपआपल्या पक्षांच्या आमदारांच्या गर्दीत विधानसभेत दाखल झाले. मात्र या साऱ्यादरम्यान विधानसभेच्या पायऱ्यांवरच अचानक उद्धव ठाकरेंचे पुत्र तसेच वरळी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस आमने-सामने आले. त्यानंतर हे काही घडलं त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.
देवेंद्र फडणवीस यांनी 5 डिसेंबर रोजी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्याबरोबरच शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीच्या अजित पवारांही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत निकाल लागल्यानंतर 12 दिवसांपासून सुरु असलेल्या मुख्यमंत्री कोण होणार? या सस्पेन्सवर पडदा टाकला. पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सुद्धा या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. अनेक केंद्रीय मंत्री, भाजपाची सत्तात असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री, क्रिकेटपटू, कलाकार, अभिनेते यांच्या उपस्थितीत मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीसमोरील आझाद मैदान येथे सायंकाळी हा शपथविधी सोहळा पार पडला. त्यानंतर कालीदास कोळंबकर यांना राजभवनामध्ये हंगमी अध्यक्ष म्हणून शपथ देण्यात आली. आजपासून आमदारकीची शपथ देण्याच्या उद्देशाने हे अधिवेशन सुरु झालं आहे. सदर अधिवेशनामध्ये विरोधीपक्षाचे आमदारही सहभागी झाले आहेत.
अधिवेशनासाठी वरळीचे नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे विधानसभेच्या पायऱ्यांवर पोहचले तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथेच उभे होते. आदित्य ठाकरेंनी त्यांना पाहताच हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. मुख्यमंत्र्यांनीही हसत हसत हात पुढे केला आणि दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलन केलं. आदित्य ठाकरेंनी फडणवीसांचं मुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन केलं तर फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना निवडणूक जिंकल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. अगदी काही सेकांदासाठी झालेली ही भेट विधानसभेमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
Devendra Fadnavis And Aditya Thackeray Meet Video | विधानसभेच्या पायऱ्यांवर CM फडणवीस आणि आदित्य ठाकरे आमने-सामने आले तेव्हा#devendrafadnavis #adityathackeray #specialsession #zee24taas #maharashtrapolitics pic.twitter.com/GhnahpzkVt
— ZEE २४ तास (@zee24taasnews) December 7, 2024
मागील पाच वर्षात ज्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्राने पाहिलं त्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांच्या कृतीचं कौतुक होताना दिसत आहे. विशेष म्हणजे फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे, शरद पवारांना आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र हे दोन्ही नेते या सोहळ्याला गैरहजर होते.