नाशिक : नाशिकच्या आयुक्त पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढेंनी कर्मचा-यांना पहिल्याच दिवशी आपल्या शिस्तबद्ध आणि काटेकोर वर्तवणुकीचं दर्शन घडवलं. यामुळे कर्मचारी आणि अधिका-यांची चांगलीच धावपळ उडाली.
आस्थापना आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला भेट देत कार्यालय तपासलं. यावेळी शिस्तीचा बडगा दाखवत सार्वजनिक बांधकाम विभागात काम न सांगता आल्याने मुंढेंनी दोन कर्मचा-यांच पगारवाढ थांबविली. तर इतर कर्मचा-यांची झाडाझडती घेत काम करण्याचा इशारा दिला.
रस्त्यावरील पार्कींगसाठी पाचपट शुल्क आकारणार असल्याचं सांगत प्लॅस्टीक बंदी काटेकोरपणे राबवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. कचरा विलगीकरण घरातच लोकांनी करावं असं आवाहनही त्यांनी केलं. नाशिकमध्ये भाजप सत्तेत आहे. त्यातच आता तुकाराम मुंढेंची नियुक्ती झाल्याने विरोधकांचा स्वर धारदार झालाय. तर सत्ताधारी भाजपने तुकाराम मुंढे यांचं स्वागत केलंय.
अनिल महाजन हे अग्निशमन दलाचे अधिकारी गणवेशाशिवाय बैठकीत बसले होते, यावर तुकाराम मुंढे यांनी त्यांना बैठकीतून बाहेर जाण्यास सांगितले. हे ऐकून सर्व अधिकारी अवाक झाले.
मात्र यानंतर काही वेळाने अग्निशमन दलाचे अधिकारी अनिल महाजन हे गणवेशासह बैठकीत हजर झाले, यानंतर अनिल महाजन यांना पुन्हा बैठकीत तुकाराम मुंढे यांनी सामिल करून घेतले.