मनसेकडून युतीचा प्रस्ताव आला तर? दोन्ही ठाकरे एकत्र येणार? उद्धव ठाकरे म्हणाले, 'त्या क्षणाला...'

Uddhav Thackeray On Alliance With Raj Thackeray MNS: राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट अजित पवारांच्या नेतृत्वाखाली शिंदे सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली. यावरच उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच मौन सोडलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 27, 2023, 09:41 AM IST
मनसेकडून युतीचा प्रस्ताव आला तर? दोन्ही ठाकरे एकत्र येणार? उद्धव ठाकरे म्हणाले, 'त्या क्षणाला...' title=
संजय राऊत यांच्या प्रश्नाला उत्तर देताना केलं विधान

Uddhav Thackeray On Alliance With Raj Thackeray MNS:  राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट अजित पवारांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील जुलै महिन्याच्या सुरुवातीला सरकारमध्ये सहभागी झाला. यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी पुन्हा एकत्र यावं यासंदर्भातील चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरु झाली. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुंबईमध्ये काही ठिकाणी राज आणि उद्धव यांनी एकत्र यावं अशापद्धतीची बॅनरबाजी झाली. प्रसारमाध्यमांमध्येही दोन्ही ठाकरे एकत्र येणार का याबद्दलच्या चर्चा सुरु झाला. मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीसंदर्भात मागील महिन्याभरापासून दबक्या आवाजात आणि उघडपणेही चर्चा सुरु आहे. याच चर्चेवर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये मनसे-ठाकरे गट युतीवर मौन सोडलं आहे.

दोन्ही भाऊ एकत्र येणार का?

संजय राऊत यांनी दोन्ही भाऊ एकत्र येतील का? या चर्चेला काही आधार आहे का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारला. यावर उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी, "आधार असता तर चर्चा थांबलीच नसती ना. आपणच म्हणता त्याप्रमाणे चर्चा झाली आणि चर्चा थांबली. ज्याने कोणी चर्चा करण्याचा प्रयत्न केला असेल त्याला आधारा मिळाला नाही म्हणून चर्चा थांबली असेल," असं उत्तर दिलं. 

मनसेकडून प्रस्ताव आला तर?

उद्धव ठाकरेंच्या उत्तरावर संजय राऊत यांनी जर असा एखादा चर्चेचा प्रस्ताव (मनसेकडून) आला तर काय कराल? असा प्रतिप्रश्न केला. त्यावर उत्तर देताना, "मी आला तर... गेला तर... यावर कधीच विचार करत नाही. गेला तरी विचार करत नाही आणि आला तरी विचार करत नाही. त्या क्षणाला काय असतं त्याचा विचार करतो. त्यामुळे आता तशी काही चर्चा नाही. त्यामुळे असं बोलण्याची काही आवश्यकता नाही," असं सूचक विधान उद्धव यांनी केलं. उद्धव यांनी मनसेबरोबरच्या संभाव्य युतीची शक्यता पूर्णपणे फेटाळीही नाही हे विशेष.

नक्की वाचा >> शिंदे गटाचे आमदार तुम्हाला भेटायला आले तर? उद्धव ठाकरे म्हणाले, 'माझ्याकडे येण्याची...'

'इंडिया'चं समर्थन

"महाविकास आघाडीची व्याप्ती आता वाढलेली आहे आणि त्याचंच रूपांतर आता देशभरात ‘इंडिया’ नावानं झालं आहे. इतर राज्यांतले जे प्रादेशिक पक्ष आणि काँग्रेस हा मोठा पक्ष असून आता इतर पक्ष त्यात सामील झाले आहेत. कारण आता ही लढाई केवळ कोणत्या राजकीय पक्षाच्या अस्तित्वाची नाही, देशाच्या लोकशाहीची आणि देशाच्या स्वातंत्र्याची आहे," असं म्हणत उद्धव ठाकरेंनी 'इंडिया' गटाचं समर्थन केलं. 

नक्की वाचा >> पवारांना निवृत्तीचा सल्ला देणाऱ्या अजित पवारांवर उद्धव ठाकरेंचा निशाणा; म्हणाले, 'तुमचं पटत नसेल तर...'

‘माझा देश माझी जबाबदारी’

भाजपावरही उद्धव यांनी निशाणा साधला. "ते असं म्हणतात की परिवार वाचवणारे सगळे विरोधक तिकडे एकत्र आले आहेत. मग तुम्ही सत्ता वाचवायला एकत्र आलात का?" असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना विचारला आहे. "जसं बंगळुरूला परिवार वाचवण्यासाठी ही लोकं एकत्र आली असं त्यांचं म्हणणं आहे. मी ठामपणे म्हणतो, होय... परिवार वाचवण्यासाठी एकत्र आलोत. माझा देश माझा परिवार आहे. हेच माझं हिंदुत्व आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही संकल्पना मी कोविड काळात राबवली होती. तीच आज देशभरात राबवण्याची वेळ आली आहे, की ‘माझा देश माझी जबाबदारी’ आहे," असं उद्धव यांनी म्हटलं.