कुडाळ : येथे मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण भूमीपूजनाचा कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते नारायण राणे एकाच मंचावर आले. यावेळी राणे यांनी उद्धव आणि रश्मी ठाकरे यांचे नाव घेतले. त्यानंतर उद्धव यांनीही जुन्या आठवणींना उजाळा देत राणेंचा भाषणात उल्लेख केला.
कोकण आणि मुंबई एकच हृदय आहे, असं सांगत उद्धव ठाकरे म्हणाले मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे मुंबईतले कोकणी वेगाने गावी येतील. रस्ते अरुंद असले तरी हृदय विशाल आहेत, असे सांगत उद्धव यांनी विकासाला प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले. यावेळी उद्धव यांनी राणेंचे नाव घेतले. माझे पूर्वीचे सहकारी नारायणराव राणे आहेत, असे म्हणतातच उपस्थितांत टाळ्यांचा कडकडाट झाला.
दरम्यान, नारायण राणेंनी भाषणाला सुरूवात करताच राणे समर्थकांनी घोषणाबाजी केली. तर भाषणात उद्धव आणि रश्मी ठाकरेंच्या नावाचा उल्लेख करताच शिवसैनिकांनीही जोरदार घोषणाबाजी केली. विकासकामांमध्ये पक्षीय राजकारण आणयला नको असं राणेंनी आवर्जून नमूद केलं.
केंद्रात गडकरी आणि राज्यात फडणवीस सर्वांगीण विकास करत असल्याचं राणेंनी कौतुक केलं. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या ठिकाणी राणेंची एन्ट्री होताच राणे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये जोरदार घोषणायुद्ध बघायला मिळालं.
स्थानिक काँग्रेस पदाधिकारी दत्ता सामंत, सतीश सावंत, राकेश परब, रणजित देसाई यांना पोलिसांनी कार्यक्रमस्थळी प्रवेश नाकारला. त्यावरून या नेत्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. सर्व पक्षांचे जिल्हाध्यक्ष व्यासपीठावर असताना काँग्रेस जिल्हाध्यक्षालाही स्थान मिळावं, अशी मागणी हे नेते करत होते. त्यावर हे आयोजकांचं काम असल्याचं सांगत पोलिसांनी सावंत आणि सामंत यांना ताब्यात घेतले.
- माझे पूर्वीचे सहकारी नारायणराव राणे '
- कोकण मुंबई हृदय एकच : उद्धव ठाकरे
- या चौपदरीकरणामुळे मुंबईतले कोकणी वेगानं गावी येतील
- रस्ते अरुंद असले तरी हृदय विशाल आहेत
- उद्धव ठाकरे यांच्या भाषणावेळी जोरदार पाऊस सर आली, उद्धव म्हणाले ' हा तर आशीर्वाद '
- या सुख सोयी स्थानिकांना हव्यात उपऱ्याना नको
- विकासाचा महामार्ग इन्फ्रास्ट्रक्चर मधून तयार होतो, तेव्हाच समृद्धी होते
- इथला पर्यावरण सुरक्षित राहिलं पाहिजे, पण विकासही तितकाच आवश्यक
- राणे आणि उद्धव म्हणाले ते मान्य विकासात राजकारण नको
- महाराष्ट्रतलं सरकार कोकणाच्या विकासाच्या पाठी खंबीर पणे उभे राहील असा विश्वास इथल्या जनतेला देतो