मुंबई: UPSC परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. यावेळच्या निकालात महाराष्ट्रानं बाजी मारल्याचं दिसत आहे. यूपीएससी निकालात 100 हून अधिक महाराष्ट्रातील विद्यार्थी यशस्वी झालेत. एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हासू अशीच अवस्था या विद्यार्थ्यांची आणि आई-वडिलांची झाली आहे.
यूपीएससी परीक्षेच्या निकालात महाराष्ट्रानं जोरदार मुसंडी घेतली आहे. तब्बल 100 हून अधिक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं आहे. या निकालात महाराष्ट्राची मृणाली जोशी देशात 36वी आली. तर नगरचा विनायक नरवदे 34वा आलाय. त्यांच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे.
यातल्या बहुतेक विद्यार्थ्यांनी प्रतिकुल परिस्थितीवर मात करत हे यश मिळवलं आहे. त्यापैकीच एक म्हणजे बारामतीच्या काटेवाडीतील अलताफ शेख. घरची परिस्थिती बेताची मात्र तरीही त्यानं जिद्द सोडली नाही. तर धुळ्यातील आसीम किफायत खान हा तरुण देशभरातून उर्दू माध्यमातून यूपीएससी उत्तीर्ण झालेला पहिला आणि एकमेव उमेदवार ठरला आहे.
पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपळे धुमाळ गावच्या प्रतीक धुमाळ जिल्हा परिषदेतून शिक्षण घेतलं. शिक्षणाचा ध्यास त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. त्याच्या यशानं सा-या गावात आनंदाचं वातावरण आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी इथला आनंदा पाटीलही अपवाद ठरलाय. अल्प दृष्टीसारख्या आजारावर मात करत त्यानं UPSC परीक्षेवर आपलं नाव कोरलं आहे.
यंदाच्या निकालात लातूर पॅटर्ननं पुन्हा एकदा कमाल दाखवली आहे. लातूर जिल्ह्यातल्या सात विद्यार्थ्यांनी यशाला गवसणी घातली आहे. विनायक महामुनीनं देशात 95वा रँक मिळवला आहे. लातूरच्याच नितिशा संजय जगताप या अवघ्या 21 वर्षांच्या तरुणीनं पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केल. तर शुभम स्वामीनं 75 टक्के दृष्टीदोष असतानाही त्यावर मात करत यश मिळवलं आहे.
लातूरप्रमाणेच नगरच्या पाच विद्यार्थ्यांनीही बाजी मारली आहे. नगरमधील विनायक नरवदेनं देशात 37वा तर राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. विनायकच्या यशाची बातमी समजताच त्याच्या घरी आनंदोत्सव साजरा झाला. प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी विनायकनं अमेरिकेतील नोकरीही सोडली. दुस-या प्रयत्नात त्यानं हे यश संपादन केलं. यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्र मागे नाही हेच या विद्यार्थ्यांनी दाखवून दिलंय. त्यांचं करावं तितकं कौतुक थोडंच म्हणावं लागेल.