मुंबई : व्हॅलेंटाईन डे हा जगभरात प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रेमी युगुलांमध्ये उत्साहाला उधाण आलं आहे. यादिवशी अनेक जण आपलं प्रेम व्यक्त करतात. प्रेमाच्या आणाभाका घेतात...पण याच व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी विद्यार्थ्यीनींनी चक्क प्रेमात न पडण्याची शपथ घेतली आहे.
अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीद्वारे महिला व कला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना चक्क प्रेमात न पडण्याची शपथ दिली आहे. सध्या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी या शपथेची जोरदार चर्चा रंगली आहे. महाराष्ट्रात घडत असलेल्या महिला अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर ही शपथ घेतली, असा कयास लावला जात आहे.
शपथेतील मजकूर पुढीलप्रमाणे
"मी अशी शपथ घेते की, माझा माझ्या आई-वडिलांवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे सभोवताली घडणाऱ्या घटना लक्षात घेता, मी प्रेम व प्रेमविवाह करणार नाही. त्याशिवाय मी माझे लग्न हुंडा घेणाऱ्या मुलाशी करणार नाही. सामाजिक परिस्थितीमुळे आज माझे लग्न माझ्या कुटुंबाने हुंडा देऊन केले, तर भावी पीढीतील एक माता म्हणून मी माझ्या होणाऱ्या सुनेकडून हुंडा घेणार नाही. तसंच मुलीसाठी हुंडा देणार नाही. समर्थ भारतासाठी, स्वस्थ समाजासाठी एक सामाजिक कर्तव्य म्हणून मी ही शपथ घेते.
प्रेम करण्याला आमचा विरोध नाही. प्रेम वाईट आहे, असंही आमचं म्हणणं नाही. पण कुमारवयात मुलींना प्रेम आणि आकर्षण यातील फरक कळत नाही. त्यामुळे आपल्यासाठी योग्य व्यक्ती कोण याची त्यांना जाणीव नसते. यामुळे ही शपथ घेतल्याचं महिला कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रदीप दंदे यांनी दिलं आहे.