वसई : वसईजवळ खार जमिनीवर १५६० एकर जागेवर ग्रोथ सेंटर उभारण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाविरोधात स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. तब्बल ६३ हजार ग्रामस्थांनी या प्रस्तावाला कडाडून विरोध दर्शवलाय.
एमएमआर ड्राफ्टमध्ये इथे ग्रोथ सेंटरच्या माध्यमातून निवासी विभाग, आरोग्य केंद्र, शैक्षणिक संस्था, क्रीडा केंद्र, मनोरंजन केंद्र उभारण्याचं घाटत आहे. मात्र आत्ता आत्तापर्यंत हे क्षेत्र ना विकास क्षेत्राअंतर्गत होतं. नाईट फ्रँक या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सल्लागाराने हा प्रस्ताव एमएमआरसाठी तयार केलाय.
स्थानिक आमदार क्षितीज ठाकूर याला पाठिंबा देणारा एक प्रमोशनल व्हीडीओ तयार केलाय. मात्र या ग्रोथ सेंटरमुळे पर्यावरणाला आणि इथल्या संस्कृतीला धक्का पोहोचेल असा आक्षेप घेत ६३००० स्थानिकांनी विरोध केलाय. बिल्डरांच्या फायद्यासाठी हा प्रस्ताव तयार केल्याचा स्थानिकांचा आक्षेप आहे. स्थानिकांच्या मुलभूत समस्याच अजून सुटलेल्या नाहीत त्यामुळे आधी त्या पूर्ण सोडवा मग ग्रोथ सेंटर उभारा असा दावा काही ग्रामस्थांनी केलाय.