नाशिक : शेतकरी संपामुळे ठप्प असललेल्या राज्यभरातल्या बाजार समित्या आता पूर्वपदावर येऊ लागल्या आहेत. बुधवारी नाशिक बाजार समितीमध्ये ६० ते ७० क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली होती. आज त्यात सुधारणा झाली असून साधारणतः १५० क्विंटल आवक झाली आहे. भाजीपाला बाजार समितीमध्ये घेऊन येण्या-यांमध्ये शेतकऱ्यांची संख्या अजून कमी आहे.
शेतात भाजीपाला खराब होत असल्यामुळे अखेर बाजारात आणला जात असल्याचं सांगितलं जातंय. पुण्यातही मार्केट यार्डाची परिस्थिती आज पूर्वपदावर आलंय. १ हजार ८३ गाड्यांची आवक झालीय. दररोज साधारण १२०० ते १३०० गाड्याची आवक होते.
नागपूरच्या कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात देखील नेहमी प्रमाणे व्यवहार सुरु आहेत. नेहमीप्रमाणे भाजी बाजारात १०० ते ११० गाड्या आल्या आहेत. आज मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ५२५ गाड्यांची आवक झालीय. महाराष्ट्रातूनच ५० टक्के गाड्या आल्यायत. संगमनेर, कात्रज, सांगलीमधून भाजीपाला आणि फळं एपीएमसीमध्ये दाखल झालीयत. भाजीपाल्याची आवक वाढल्यानं भाज्यांचे भावही उतरायला लागलेत.