मिलिंद आंडे, वर्धा झी मीडिया : सासऱ्याची संपत्ती मिळवण्यासाठी सख्ख्या साडूने चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल असा कट रचत साडूचाच खून केला आहे. विष असलेली दारू पिऊन मोरेश्वर पिंपळेचा मृत्यू झाला. सुरूवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली मात्र तपासात ही हत्या असल्याचा उलगडा झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्ध्यामधील सेलू तालुक्यातील जुनगड येथील पिंपळेमठ परिसरात ही घटना घडली आहे. (Crime News Vardha)
नेमकं काय आहे प्रकरण?
आरोपी संदीप पिंगळेचं साडू मोरेश्वर पिंपळेसोबत वाद झाला होता. त्यानंतर संदीप पिंगळे सहा महिन्यापासून मोरेश्वरला मारण्याचा रचत कट होता. गोकुळाष्टमीच्या दिवशी त्याने मृत मोरेश्वर पिंपळेला फोन करून घराबाहेर बोलावलं आणि त्याला दारूची बाटली दिली. त्या दारुचा घोट घेताच मोरेश्वरला दातखिळ बसली आणि तो जमिनीवर कोसळला.
मोरेश्वरला घरच्यांनी सेवाग्राम इथल्या कस्तुरबा रुग्णालयात नेलं. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषीत केलं. याप्रकरणी सेलू पोलिसांनी 19 ऑगस्टला अकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र मोरेश्वरच्या पत्नी आणि नातेवाईकांनी संशय व्यक्त केला. पोलिसांनी आरोपी संदीप पिंपळेची विचारपूस केली त्यांना त्याच्या जबाबावरून शंका आली. त्यानंतर पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवल्यावर संदीप पिंपळेने आपला गुन्हा कबूल केला.
आरोपी संदीपने जडीबुटी विकणाऱ्यांकडून विष आणलं होतं. संदीप पिंपळेच्या कुटुंबातील सदस्यांची प्रकृती खराब राहत असल्याने त्याने यापूर्वी जडीबुटी विकणाऱ्यांकडून काही औषधं घेतली होती. तेव्हापासूनच संदीप जडीबुटी विकणाऱ्यांच्या संपर्कात होता. यातून त्यांची ओळख वाढली आणि मोरेश्वरला मारण्याच्या कटात त्याला विष उपलब्ध करून देत मदत केली. विजयसिंह चितोडीया वय 41 आणि राजकुमार चितोडीया 22 असं विष देणाऱ्या आरोपींची नावं आहेत.
धक्कादायक म्हणजे मोरेश्वरचा मृत्यू झाल्यावरही आरोपी संदीप स्मशानात त्याच्याअंत्यसंस्काराला गेला आणि नातेवाईकांनाही भेटला होता. मात्र मोरेश्वरच्या मृत्यूमागे त्याचाच हात असल्याचं समजल्यावर सर्वांनाच धक्का बसला. या घटनेत कोणत्या प्रकारचे विष वापरण्यात आले याची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी जप्त केलेली बॉटल प्रयोगशाळेत पाठवली आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.