Vanchit Bahujan Aghadi Ready To Go With RSS: वंचित बहुजन आघाडीचे नेते महाविकास आघाडीबरोबर जागा वाटपासंदर्भात चर्चा करत आहेत. मागील काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसबरोबर वंचितच्या नेत्यांच्या बैठका सुरु आहेत. लोकसभेसाठी वंचितला किती जागा सोडाव्यात याबद्दल चर्चा सुरु आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आता थेट भारतीय जनता पार्टीची मातृक संस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबरोबर जाण्याचा विचार करु शकतो असं मत व्यक्त केलं आहे. प्रकाश आंबेडकरांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
प्रकाश आंबेडकरांनी शुक्रवारी, 1 मार्च रोजी नागपूरमध्ये पत्रकाराशी संवाद साधताना हे विधान केलं. प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीबरोबर जागा वाटपाबद्दलच्या चर्चा सुरु असल्याचं सांगितलं. फूट पडलेल्या पक्षांनी क्षमता पाहून जागांची मागणी करावी या आपल्या भूमिकेचं समर्थन प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे. यावेळेस महाविकास आघाडीबरोबरच्या जागा वाटपाबद्दल बोलताना आमची 48 पैकी 46 जागी उमेदवार देण्याची तयारी पूर्ण झालेली आहे. सध्या आम्ही कोणत्या जागांसाठी आग्रही आहोत हे महाविकास आघाडीला कळवल्याचं आंबेडकरांनी सांगितलं.
याच मुलाखतीमध्ये त्यांना तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबरोबर जाण्याचं विधान केलं, असं म्हणत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना प्रकाश आंबेडकरांनी, "आमचा कोणताही राजकीय अजेंडा नाही. सामाजिक परिवर्तनावर आमचा विश्वास आहे. समाजिक परिवर्तन करताना सत्ता मिळाली तर आम्ही निश्चित घेणार. आताची परिवर्तनाची जी गरज आहे. जातीवर आधारित पुरोहित आहेत. आज कुंभाराचं मुलं, लोहाराचं मुलं पुरोहित म्हणून त्याच्या समाजातच मान्यता आहे. इतर समाजात त्याला मान्यता नाही. समाजामध्ये समता आणि अधिकार या दोन्ही गोष्टी आणायच्या असतील तर हे असे प्रकार सिम्बॉलिक आहेत असं आम्ही मानतो. आता जातीवर आधारित जे पुरोहित आहेत ती पूर्ण कायद्याने बंदी घातली जाईल. हिंदू स्कूल ऑफ थिओलॉजी उभं केलं जाईल. त्यामधून जो पुरोहितबाहेर पडेल त्यालाच या देशात धार्मिक विधी करता येतील. त्यांच्या मार्फतच विधी करुन घेतल्या जातील असा कायदा आणि सुधारणा करायला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तयार असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर जाण्याचा विचारही करु शकतो," असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी 2 जागा सोडणार असल्याची चर्चा असली तरी प्रकाश आंबेडकरांनी आम्ही किमान 6 जागा जिंकून आलो आहोत, असं म्हणत सूचक विधान केलं आहे.