वाई: कर्जावर दिलेल्या पैशांची वसुली करण्यासाठी एका तरूणाला चक्क सिगारेटचे चटके आणि बेदम मारहाण केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण येथे हा भयानक प्रकार घडला. नितीन रमेश चांडक (वय ३२, रा. मारवाड पेठ, फलटण) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरूणाचे नाव असून, त्याच्यावर सातारा जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
नितीन चांडक याने दिलेल्या माहितीनुसार, युवराज किसन पवार प्रसाद किसन पवार (रा. सोमवार पेठ, फलटण) व त्यांच्या तीन साथीदारांनी हे कृत्य केले. नितीन चांडक यांचा फटाका विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांची पत्नी फलटणच्या मारवाड पेठेत शिक्षिका आहे. साधारण सहा वर्षांपूर्वी नितीन यांनी पवार याच्याकडून फटाका स्टॉलसाठी ५० हजार रूपये घेतले होते. ही रक्कम व्याजाने घेतली होती. व्याज आणि मूळ मुद्दलापोटी नितीन यांनी १ लाख ३७ हजार रूपयांचा परतावा केला. पण, परतावा करूनही मुद्दल बाकी असल्याचा दावा पवार सातत्याने नितीन यांच्याकडे करत असे. तसेच, पैशांची मागणी करून नितीनला त्रास देते असे.
दरम्यान, काल सायंकाळी साडेसातच्या सुमारास नितीन हे बारसकर चौकात थांबले होते. याच वेळी पवार आणि त्याचे साथिदारही चारचाकी गाडीने तेथे पोहोचले. पवार याने नितीन यास बोलावून घेतले व मूळ मुद्दल अद्याप दिलेच नाहीस. ते दे असे म्हणत गाडीत बसायला लावले. नितीन याने गाडीत बसायला नकार दिला. पण, त्याच्या चार साथीदारांनी त्याला जबरदस्तीने गाडीत बसवले.
नितीनला घेऊन पवार हा गाडीसह मिरगाव फाटा तसेच मुधोजी कॉलेजच्या पाठीमागील बाजूला आणली. तेथे नितीन याला दगड, रॉड, काचेच्या बाटल्यानी गंभीर मारहाण केली. तसेच सिगारेटचे चटकेही दिले. या वेळी नितीन याच्या पत्नीलाही फोनवरून दमदाटी करण्यात आली. मारहाण झाल्यावर नितीन याला तशाच आवस्थेत जिंती नाक्यावर फेकून देण्यात आले. घडल्या प्रकाराची माहिती चांडक यांनी आपल्या पत्नीला फोनवरून दिली. त्यानंतर पत्नी आणि नातेवाईक नितीनला घेऊन फलटण शहर पोलिस ठाण्यात गेले. मात्र, पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नसल्याचा दावा प्रसारमाध्यमांनी केला आहे. नितीन यांना फलटण येथील शासकीय रुग्णालयात नेले. मात्र, उपचारासाठी पहाटेच्या सुमारास त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.