मुंबई : मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षा बंगल्यावर पूरग्रस्त मदतीबाबतची आढावा बैठक संपली असून यामध्ये पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. उद्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मदतीचा प्रस्ताव मांडला जाणार असून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उद्या मंत्रीमंडळ बैठकीत पॅकेज जाहीर होण्याची शक्यता आहे.
शेतीची नुकसान भरपाई, घरांचे नुकसान, लहान व्यापाऱ्यांचे नुकसान, रस्ते-पूल दुरुस्ती, वीज यंत्रणा दुरुस्ती याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. तसेच उद्या मंत्रीमंडळ बैठकीत पूरग्रस्तांच्या मदतीसाठीचा प्रस्ताव येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थिती आणि नुकसानीबाबत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानी आढावा घेतला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानीबाबतची आकडेवारी आणि मदतीबाबत तपशीलवार वस्तूनिष्ठ अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्य आणि केंद्राच्या कोण-कोणत्या योजनांमधून सवलत देता येईल, मदत करता येईल त्याबाबतचे प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहेत.
राज्यात अनेक जिल्ह्यात पुराचा फटका सर्वसामान्य जनतेला बसला आहे. मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे लवकरात लवकर मदत मिळावी अशी अपेक्षा पूरग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली होती.