मुंबई : एका भयंकर दुर्दैवी विमान अपघातातून मुंबईकर आणि विमानातील प्रवासी बालंबाल बचावले. विस्तारा आणि एअर इंडियाची विमाने अवकाशात काही फुटांत मोजता येईल इतक्या जवळ आली. काही सेकंदांमध्येच दोन्ही समोरासमोर धडक होणार असे समजून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. पण, एअर इंडियाची महिला पायलट अनुपमा कोहलीने प्रसंगावधान दाखवले आणि धोका टळला. प्रवाशांना जीवदान मिळाले. विशेष असे की, दोन्ही विमानामध्ये महिलाच पायलट होत्या.
प्रात्प माहिती अशी की, एअर ट्रॅफीक कंट्रोलर्स (एटीसी) कडून कोऑर्डिनेशन करताना काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे विमानांना योग्य ते संदेश मिळाले नाहीत. दरम्यान, दोन्ही विमाने अत्यंत जवळ आली. काही क्षण प्रचंड तणावाचे वातवरण नर्माण झाले. पण, दोन्ही पायलट्सनी मोठ्या कुशलतेने परिस्थिती नियंत्रणात आणली. ही घटना एअर इंडियाचे विमान क्रमांक ए-३१९ (मुंबई ते भोपाळ) आणि ए-३२० (दिल्ली ते पुणे) दरम्यान अवकाशात घडली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही सेंकद ही दोन्ही विमाने समान अंतरावर एकमेकांजवळ हवेत होती. विस्ताराच्या विमानाने आपली निर्धारीत उंची २९ हजार तर एअर इंडियाच्या विमानाने २७,१०० फुटांची उंची गाठली होती. विमानातील कॉकपीटमध्ये परिस्थिती पाहून बरीच तणावपूर्ण स्थिती होती. विशेष म्हणजे घटना घडली त्या वेळी विमानाचे नियंत्रण सहकारी पायलटकडे होते. विमानाचे मुख्य पायलट काही काळासाठी टॉयलेट ब्रेकवर होते. एअर इंडियाच्या विमानाची पायलट अनुपमा कोहली होती.