मुंबई : काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली. या भेटी दरम्यान त्यांनी परतीच्या पावसामुळे महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे, त्यावर त्यांना जास्तच जास्त मदत देण्यात यावी, तसेच पंचनाम्याची मुदत देखील वाढवून देण्यात यावी अशी मागणी राज्यपालांकडे केली आहे.
तसेच तहसिलदार, तसेच तलाठ्यांना अजूनही प्रत्येक ठिकाणी पोहोचणं, इतक्या कमी वेळात शक्य होत नसल्याचं अजित पवार यांनी राज्यपालांना भेटून आल्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितलं.
राज्यात अंदाजे दीड कोटी एकरावर नुकसान झालं आहे, काळजीवाहू सरकारने जे १० हजार कोटी रूपयांची मदत म्हणून घोषणा केली आहे, ती रक्कम फारच तुटपुंजी आहे, म्हणून यात वाढ करणे गरजेचे आहे. हेक्टरी ५० हजार रूपयांची मदत झाली पाहिजे. पिकविमा अनेक शेतकऱ्यांनी काढलेला आहे, पण तरीही पिक विमा कंपन्या व्यथा ऐकायलाही तयार नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
शेतकऱ्यांना निदान पिककर्ज माफी द्या आणि वीजबिल माफ करा, अशी मागणी अजित पवार, बाळासाहेब थोरात आणि त्यांच्यासोबत आलेल्या नेत्यांनी राज्यपालांकडे केली आहे. केंद्राकडून मदतीची वाट न पाहता मदत करा, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.