मुंबई : Reopen School News : राज्यातल्या शाळा एक डिसेंबरपासून सुरू होत आहेत. तरीही ऑनलाईन वर्ग सुरूच राहणार असल्याचे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. दरम्यान, नवी मुंबईतही शाळा सुरु होणार असल्यातरी ऑनलाईन वर्ग सुरु राहणार आहेत, असे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. पालकांनी मुलांना शाळेत पाठवले नाही तर मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. ( Online School in Mumbai, Navi Mumbai)
दरम्यान, राज्यात मुलांचे लसीकरण झालेले नाही. त्यामुळे भीतीपोटी पालक मुलांना शाळेत जाण्यापासून रोखू शकतात. त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. तर दुसरीकडे कोरोनाच्या नव्या व्हिरिएंट ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर आणि उपमहापौर सुहास वाडकर यांनी मुंबई विमानतळाची पाहणी केली. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची कशा पध्दतीने तपासणी करण्यात येतेय याची पाहणी करून योग्य ते निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचा उद्रेक असलेल्या 13 देशांतून गेल्या 15 दिवसांत 466 नागरिक मुंबई विमानतळावर आलेत. तर गेल्या 10 नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून तब्बल 1 हजार लोक मुंबईत परतले आहेत. त्या सगळ्यांचं बीएमसीकडून ट्रेसिंग सुरू आहे, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
ठाण्यामध्ये 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर या काळात किमान सात जण दक्षिण आफ्रिकेतून आल्याचं समोर आले आहे. या सात जणांचा महापालिकेने शोध सुरू केला आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटची लक्षणे आढळल्यास तपासणी आणि विलगीकरण केलं जाणार आहे.
नाशिक शहरातून दक्षिण आफ्रिकेत आयर्नमॅन स्पर्धेसाठी गेलेल्या दोन खेळाडूंचे विलगीकरण करण्यात आले आहे. या दोघांना तसच त्यांच्या पत्नींना नाशिक महापालिकेनं विलगीकरण कक्षात ठेवले आहे. या दोघांच्याही RTPCR टेस्ट घेण्यात आल्या आहेत. परदेशातून आलेल्या लोकांचा सध्या पालिकेमार्फत शोध घेतला जात आहे.