मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा. त्यानंतर चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवू, असे आश्वासन बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी दिले आहे. संप पुकारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मेस्मांतर्गत कारवाईला सुरुवात केली असल्याचेही त्यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांना कायद्यानुसार संप करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे उद्या पोलिसांची मदत घेऊन बसेस रस्त्यावर उतरवणार असल्याचे महाव्यवस्थापक म्हणाले. बेस्ट संपावर तोडगा काढण्यासाठी बेस्ट प्रशासन आणि बेस्ट कामगार सेना यांच्यात बैठक झाली. मात्र ही बैठक तोडग्याविनाच संपली. तर शिवसेनाप्रणित बेस्ट कामगार सेनेत फूट पडल्याचे, बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी मान्य केले. बेस्ट कामगार सेनेनं संपातून माघार घेण्याची घोषणा केली. मात्र कर्मचाऱ्यांनीच कामावर जाण्यास नकार दिला.
बेस्ट कामगार सेनेच्या मुलुंड, विक्रोळी, शिवाजीनगर, आणिक, वांद्रे आगारातील काही सभासदांनी सामूहिक राजीनामे दिले. बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाचा आजचा दुसरा दिवस असून आजही मुंबईकरांचे हाल होत आहेत. बेस्ट संपाला शिवसेनाप्रणित कामगार सेनेने जाहीर पाठिंबा दिला होता. मात्र, अचानक यूटर्न घेत बेस्टच्या संपातून माघार घेतली. असे असलेतरी कामगार मात्र अजूनही कामावर रुजू झालेले नाहीत. शशांक राव यांच्या नेतृत्वाखाली बेस्ट कृती समितीने संप सुरूच ठेवला आहे. 'बेस्ट'च्या ५०० हून अधिक बेस्टच्या बस रस्त्यावर धावतील, अशी घोषणा शिवसेनेने केली होती. परंतु, शिवसेनेने संपातून माघार घेतल्या नंतरही बेस्ट कर्मचारी दुसऱ्या दिवशीही गैरहजर राहिले. त्यामुळे बस काही रस्त्यावर धावल्या नाहीत. त्यामुळे मुंबईकरांची गैरसोय झाली.
संपाच्या निमित्ताने वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेनेची कामगार संघटना बैठकीत उपस्थित राहणार असेल तर बैठकीत येणार नाही, अशी भूमिका बेस्ट कृती समितीने घेतल्याने वा वाद निर्माण झाला. बेस्ट कामगार सेनेशिवाय ही बैठक पार पडली. मात्र, त्यात तोडगा काही निघाला नाही. दरम्यान, या संपाच्या निमित्ताने बेस्ट कामगार सेना आणि बेस्ट कृति समिती या दोन संघटनांमधला वाद चव्हाट्यावर आला. एकीकडे संप नको चर्चा करा असे आवाहन करणाऱ्या शिवसेनेच्या बेस्ट कामगार संघटनेचे अकरा हजार कर्मचारी संपात सहभागी झाल्याने शिवसेनेची अडचण झाली आहे. आज दुसऱ्या दिवशी संप सुरु आहे. त्यामुळे याचा ताण रेल्वे, मेट्रो, टॅक्सी यावर आला आहे. प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. बेस्ट प्रशासनाने एसटीच्या गाड्या काही मार्गावर सोडल्या आहेत. मात्र, त्या अपुऱ्या पडत आहे. त्यामुळे मुंबईकरांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.