मुंबई : शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या पक्षाच्या महाविकासआघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांकडे १६२ आमदारांच्या स्वाक्षरी असणारे पत्र राज्यपालांकडे सोपवले आहे. पण गटनेता नसताना असा सत्तास्थापनेचा दावा करणं म्हणजे पागलपंती असल्याची टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे.
काँग्रेसने अजूनही त्यांचा गटनेता निवडला नाही. तसंच अजित पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आहेत. जयंत पाटील यांची राष्ट्रवादीने गटनेतेपदी निवड केली असली तरी त्याला अजून मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे अजित पवार यांचाच व्हीप चालेल, असा दावा आशिष शेलार यांनी केला आहे.
महाविकासआघाडीने दिलेलं हे पत्र म्हणजे आपापल्या पक्षातील आमदारांचं बंड शमवण्यासाठी केलेला प्रयत्न आहे, असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये मोठ्याप्रमाणात असंतुष्ट आमदार आहेत. या आमदारांचं बंड थांबवण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.