Anil Deshmukh Granted Bail : केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) मार्फत चौकशी सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Former Home Minister Anil Deshmukh ) यांना जामीन मिळालेला आहे. सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात ( Bombay High Court ) याप्रकरणी सुनावणी पार पडली. यावेळी न्यायलयाने अनिल देशमुख यांना मोठा दिलासा दिला आहे. न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांच्या एकल खंडपीठाने गेल्या आठवड्यात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण केल्यानंतर याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर आता न्यायालयाने देशमुख यांना जामीन मंजूर केला.
गेल्या महिन्यात विशेष सीबीआय न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर देशमुख यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी वैद्यकीय कारणास्तव जामीन मागितला होता. त्यानंतर आता अनिल देशमुख यांना सीबीआय प्रकरणात अखेर जामीन मिळाला आहे.
गेल्या महिन्यात विशेष सीबीआय न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर देशमुख यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी वैद्यकीय कारणास्तव जामीन मागितला होता. त्यानंतर आता अनिल देशमुख यांना सीबीआय प्रकरणात अखेर जामीन मिळाला आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केल्यानंतर अनिल देशमुख गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून तुरुंगात होते. या वर्षी एप्रिलमध्ये त्यांना सीबीआयने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक केली होती. सध्या देशमुख न्यायालयीन कोठडीत असून मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात आहेत.
गेल्याच महिन्यात ईडी प्रकरणात जामीन मंजूर
ईडीच्या खटल्यात देशमुख यांना गेल्या महिन्यात उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.
अनिल देशमुख यांच्यावर आरोप काय होते?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि माजी पोलीस निरिक्षक सचिन वाझेने अनिल देशमुख यांनी 100 कोटींची खंडणी गोळा करायला सांगितल्याचा आरोप केला होता. परमबीर सिंह यांनी पत्र लिहीत हे आरोप केले होते. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर कोर्टाने सीबीआयला चौकशीचे आदेश दिले होते. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीनेदेखील कारवाईस सुरुवात केली. अनिल देशमुख यांनी भ्रष्टाचार करत बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप ईडीकडून केला होता.
ईडी आरोपांनुसार सचिन वाझेने बार सुरळीत चालवण्यासाठी मुंबईतील ऑर्केस्ट्रा बारमालकांकडून 4.7 कोटी रुपये घेतले आणि ती रक्कम देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे यांना दिली होती. यानंतर पालांडे नागपूरला गेले आणि हे पैसे एका व्यक्तीला दिले. हे पैसे हवालाद्वारे दिल्लीच्या सुरेंद्र कुमार जैन आणि वीरेंद्र जैन यांना पाठवले.जैन बांधवांनी हे पैसे बनावट कंपन्यांद्वारे नागपूरच्या श्री साई एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या देशमुख कुटुंबाच्या नियंत्रणाखाली असलेल्या ट्रस्टला दान केले.