Nagar Panchayat Election Result 2022 : महाविकास आघाडी सरकारकडून धनशक्ती, दंडशक्ती, सत्तेचा कितीही गैरवापर झाला तरी भाजपा हा क्रमांक एकचा पक्ष होता आणि राहील असं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
भाजपाच्या 24 आणि सहयोगी मिळून सर्वाधिक 30 नगरपालिकांमध्ये भाजपाने सत्ता प्राप्त केली आहे. सदस्यसंख्येत सुद्धा सर्वाधिक 415 हून अधिक जागा जिंकत भाजपा हाच क्रमांक एकचा पक्ष बनला आहे.
जिल्हा परिषदा आणि नगरपालिका निवडणुकीत भाजपाने मिळविलेल्या या दणदणीत यशाचे शिल्पकार आपले सारे कठोर परिश्रमी कार्यकर्ते आहेत.
मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो, तसंच महाविकास आघाडी सरकारचा कारभार नाकारणार्या सर्व मतदारांचेही मन:पूर्वक आभार मानतो असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
कितीही पक्ष एकत्र आले तरी या देशातील जनता ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्त्वावर विश्वास ठेवते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. मोदींचं नेतृत्त्व आणि आपल्या कार्यकर्त्यांचे परिश्रम याचेच हे यश असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
पुन्हा एकदा भाजपाचं नंबर वन
राज्यातील नगरपालिका, नगरपंचायती तसंच भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत भाजपाने सर्वाधिक जागा मिळवल्या असून पुन्हा एकदा भाजपाचं नंबर वन असल्याचं सिद्ध झालं आहे, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. गेले 26 महिने भाजप राज्यात सत्तेबाहेर आहे, तरीही पक्षाचे संघटन मजबूत आहे, भाजपाच्या नेते, कार्यकर्त्यांची एकजूट आहे, त्यामुळे पक्षाला निवडणुकीत यश मिळालं आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.
कोणत्या पक्षाला किती जागा?
राज्यातल्या 106 नगरपंचायतींच्या तब्बल 1802 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपनं सर्वाधिक 389 जागा जिंकून अव्वल नंबर मिळवलाय. तर राष्ट्रवादी काँग्रेसनं 382 जागा मिळवून दुसरा क्रमांक पटकावलाय. शिवसेना 284 जागांसह तिसऱ्या क्रमांकावर तर 274 जागांसह काँग्रेस अखेरच्या स्थानावर राहिलीय.