मुंबई : कामावर उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप बसवण्यासाठी मुंबई महापालिकेनं रामबाण उपाय शोधलाय. एक नोव्हेंबरपासून पालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन बायोमेट्रिक हजेरीला जोडण्यात येणार आहे. यापुढे पालिकेतील कर्मचाऱ्यांचे वेतन त्यांच्या उपस्थितीनुसारच काढण्यात येणार आहे. त्यामुळे एक तास उशीर झाल्यास अर्ध्या दिवसाची वेतनकपात करण्यात येणार आहे. यामुळे उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप बसेल आणि कामाचा उरक वाढेल असा दावा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलाय.
काही महिन्यांपूर्वी सर्व कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आलीयं. रुग्णालय, मलनिःसारण आणि पाणी या विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा वेगवेगळ्या असल्याने त्याची नोंद सॅप या पालिकेच्या सॉफ्टवेअरमध्ये नव्हती झाली.
परिणामी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडल्याने वाद झाला होता.
कर्मचाऱ्यांच्या रोषानंतर कामाच्या सर्व वेळांची सॅपमध्ये नोंदणीचं काम पूर्ण झालंय.
या हजेरी पद्धतीत कर्मचाऱ्यांना अर्धा तास उशिरा येण्याची परवानगी दिली असली तरी त्या दिवशी तितका वेळ अधिक काम करावे लागणार आहे.