गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई : पश्चिम उपनगरातील खार, सांताक्रूझ, बांद्रा परिसरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून पोलिसांकडून तपास सुरु होता, पण पोलिसांच्या हाती काही लागत नव्हते. मात्र, पोलिसांकडून सखोल चौकशीनंतर घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.
किशोर पवार, राहुल गुरव या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांची कसून चौकशी करण्यात आली. दरम्यान, खार येथे १४ गुन्हे, बांद्रामध्ये २ आणि सांताक्रूझ येथे ४ अशा विविध गुन्ह्यांची त्यांच्याकडून कबुली देण्यात आली.
आतापर्यंत या दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी जवळपास २.५ ते ३ कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत गेला आहे. आणखी इतर कोणत्या ठिकाणी चोरी करण्यात आली का? याविषयी पोलिसांकडून तपासणी करण्यात येत असल्याचं पोलीस उपायुक्त परमसिंग दहिया यांनी सांगितले.