दीपक भातुसे, झी 24 तास, मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये आपणच बॉस असून सर्व निर्णय प्रक्रियेवर आपलंच वर्चस्व असल्याचं मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं. यासाठी त्यांनी दोनदा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना, तर एकदा काँग्रेसच्या मंत्र्याला झटका दिला आहे.
कोणत्याही सरकारचा प्रमुख मुख्यमंत्री असतो. प्रत्येक निर्णय हा मुख्यमंत्र्यांच्या संमतीनेच होत असतो. मात्र आघाडीचं सरकार असलं की यात काही मर्यादा येतात. आघाडीतील काही पक्षांच्या दबावाखाली काही निर्णय घेणं मुख्यमंत्र्यांना भाग पडतं. मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे यांनी निर्णय प्रक्रियेत आपलं वर्चस्व असल्याचं वारंवार दाखवून दिलंय.
- मागील वर्षी २ जुलै रोजी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतील १० पोलीस उपायुक्तांच्या बदल्या केल्या होत्या. मुख्यमंत्र्यांशी चर्चा न करता या बदल्या केल्याने चारच दिवसांना मुख्यमंत्र्यांनी या बदल्या रद्द केल्या होत्या.
- राज्यात लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय ३ जून रोजी झाला होता. ४ जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार होती. तशी घोषणाही आपत्कालीन विभागाचे मंत्री विजय वड्डेटीवार यांनी केली होती. मात्र वड्डेटीवार यांनी परस्पर घोषणा केल्याने मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाचा अंमलबजावणी लांबवली आणि ७ जूनपासून लॉकडाऊन शिथिल केला जाईल असं जाहीर करून वड्डेटीवार यांना दणका दिला होता.
- तर नुकताच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या आमदाराच्या तक्रारीनंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना दणका दिलाय. करी रोड इथल्या हाजी कासम इमारतीतील म्हाडाची १०० घरे कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी टाटा कॅन्सर रुग्णालयाला देण्याचा निर्णय घेतला होता. याला स्थानिकांचा विरोध असल्याचं कारण देत शिवसेनेचे स्थानिक आमदार अजय चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांकडे याबाबत तक्रार केली. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आव्हाडांच्या निर्णयाला स्थगिती दिली. खुद्द शरद पवार यांच्या हस्ते या घरांचे हस्तांतरण टाटा कॅन्सर रुग्णालयाला करण्यात आले होते. त्यामुळे आव्हाडांनी तात्काळ मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी दुसरी घरे देण्याच्या सूचना आव्हाडांना केली.
महाविकास आघाडी सरकारमधील प्रत्येक निर्णयावर आपली पकड असल्याचं मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिलंय. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेचं विरोधी पक्षाने स्वागतच केलंय.
उद्धव ठाकरे यांना सरकार चालवण्याचा अनुभव नाही, त्यांनी कधी सरकारमध्ये काम केलेलं नाही. असं असताना ते मुख्यमंत्रीपद कसं सांभाळणार अशी चर्चा सुरुवातीपासूनच होती. त्याला आपल्या कृतीतून मुख्यमंत्र्यांनी उत्तर देऊन एक प्रकारे आपणच बॉस असल्याचं दाखवून दिलंय.