मुंबई : नाशिक जिल्ह्यातल्या निफाडमध्ये पारा २.४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलाय. गेल्या २४ तासांत तब्बल ६ अंशांनी तापमान घसरलंय. गेल्या काही दिवसांपासून राज्यातून थंडी गायब झाली होती. गेल्या पाच दिवसानंतर थंडीचा जोर पुन्हा वाढला आहे. थंड वाऱ्यामुळे गारठा निर्माण झाल्यानं या थंडीपासून उब मिळवण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहेत.
नाशिकमध्ये पारा ६ अंशांपर्यंत खाली आलाय. त्यामुळे शहरात धुक्याची झालर पसरलीये. मात्र नाशिकरांचा जॉगिंगचा उत्साह कायम आहे. थंडीतही अनेकजण धावण्यासाठी बाहेर पडताहेत.
दुसरीकडे सकाळीसकाळीच गुलाबी थंडीत नाशिककर गरमागरम मिसळीवर ताव मारायला गर्दी करतायत.
कोकणातलं मिनी महाबळेश्वर दापोलीत कडाक्याच्या थंडीचं आगमन झालंय त्यामुळे पारा कमालीचा घसरला. दापोलीचं आजचं तापमान 8 अंश सेल्सिअस आहे. बुधवारी दापोलीचा पारा 14 होता. तर काल पारा घसरून तो 12 पर्यंत आला होता. मात्र आज 8 अंश सेल्सिअसवर आलाय. थंडीचा जोर आणखी 2 दिवस राहण्याचा अंदाज डॉ बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाकडून सांगण्यात येतंय.
तर खान्देशही गारठलाय. नंदुरबार जिल्ह्यातील तापमानाचा पारा घसरल्यानं सातपुड्याच्या दुर्गम भागातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ परिसरात तापमानाचा पारा ५ अंश सेल्सिअस सेल्सिअसच्या खाली गेल्याने त्याठिकाणी दवबिंदू गारठले आहेत. कमी तापमानाचा परिणाम जनजीवनावर होऊ लागला आहे.
एकीकडे राज्यात पारा घसरला असताना नागपुरात थंडीचा जोर ओसरलाय. नागपुरात आज १५.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महत्वाचं म्हणजे गेल्या आठवड्यात नागपुरात पारा 5.7 अंशांपर्यंत खाली घसरला होता.
नागपूरसह चंद्रपूरमध्येही तापमान वाढलंय. चंद्रपूरचं किमान तापमान १६ पुर्णांक २ अंश सेल्सिअस इतकं आहे. शहर आणि जिल्ह्यात आज उशीरा सूर्यदर्शन झालं.